कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याने ते बेचिराख झाले आहे. या घटनेने कोल्हापूरकरांनाच नव्हे तर राज्यभरातील रंगकर्मींना जबरदस्त धक्का बसला आहे. या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी अनेक आघाडीच्या रंगकर्मीनी पुढे येण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय, कोल्हापुरातील अनेक सामाजिक संस्थाही या कामी मदत करण्यासाठी तयार झाल्या असल्याचे समाज माध्यमातील प्रतिक्रियातून दिसत आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याने कलाप्रेमी कोल्हापूरकरांना दुःख झाले आहे. पण त्यातूनही खचून न जाता या नाट्यगृहाला मूळ रूप देण्यासाठी लगेचच सर्वांचे तयारी दिसून येत आहे. अनेक सामाजिक संस्था , उद्योजक, व्यापारी , देणगीदार यांनी या कामी आवश्यक ती मदत देण्याची तत्पर असल्याचे कळवले आहे.
हेही वाचा >>> Keshavrao Bhosale Theater Fire: केशवराव भोसले नाट्यगृहाची आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न; वरिष्ठांची घटनास्थळी धाव
तर दुसरीकडे गायन समाज देवल क्लबचे संचालक चारुदत्त जोशी यांनी राज्यातील अनेक रंगकर्मींशी संपर्क साधला असता त्यांनी या कामासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुबोध भावे, अवधूत गुप्ते, सचिन खेडकर, मकरंद अनासपुरे यांनी हे थिएटर पुन्हा तितकेच दिमाखदार सुरू करण्यासाठी लागेल ते करण्यास आम्ही तयार असल्याचे आवर्जून कळवले आहे. कोल्हापुरातील सर्व कलाकार सोबत आहेतच. त्यामुळे कोल्हापुरकर एकत्र येऊन हा सांस्कृतिक ठेवा पुन्हा उभा करणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानंतर नाट्य – रंगकर्मीनी उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्व कलाकार एकत्र येणार राख संकलित करून ठेवाणार आहेत.