कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक असलेल्या ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर यांचे वयाच्या शहाण्णवव्या वर्षी शुक्रवारी सकाळी मुंबईत वार्धक्यात निधन झाले.
म्हैसूर येथील संग्रहालयातील ग्लोरी ऑफ होप हे गाजलेले चित्रपट रेखाटणाऱ्या सावळाराम लक्ष्मण तथा एस. एल. हळदणकर यांच्या शिष्या सुधा मदन यांनी मुंबईत जे. जे. मधून जी. डी. आर्ट व आर्ट मास्टर हे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टची फेलोशिपही मिळाली होती. जलरंग व तैलरंगात क्लासिकल तसेच इम्प्रेशनिस्ट शैलीत चित्रे ही खासियत असणाऱ्या सुधा मदन यांची देशभरामध्ये शंभराच्या घरात चित्रप्रदर्शने झाली होती. राष्ट्रीय पातळीवर तीन सुवर्णपदके तसेच अनेक रौप्यपदके सुधा मदन यांनी जिंकली होती.
हेही वाचा…कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ट्रॅक्टर उलटला, सातजण बेपत्ता, शोध मोहीम सुरू
द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्य असणाऱ्या सुधा मदन याना दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्ट्स् सोसायटीने सन्मानित केले होते, तसेच २००० साली विजू सडवेलकर अॅवॉर्ड सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात मुलगा अजित, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध ऊपळेकर परिवारात जन्मलेल्या सुधा मदन यांचे वडील सराफी व्यवसायात होते. सुधा मदन या चित्रकार अनिल ऊपळेकर व पत्रकार राजा ऊपळेकर यांच्या सख्ख्या चुलत भगिनी होत.