दयानंद लिपारे, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे भाव गगनाला भिडले आहेत. परिणामी या सफेद व्यवहाराला धागा मिश्रण करण्याच्या ( भेसळ) काळय़ा व्यवहाराची किनार लागली आहे. सुतामध्ये अन्य प्रकारच्या स्वस्त किमतीच्या धाग्यांचे बेमालूम मिश्रण केले जात आहे. त्याचा परिणाम कापड प्रक्रियेवर (प्रोसेस) होत आहे. यातून बडय़ा कंपन्या, नामांकित ब्रँड व निर्यातदारांनी तक्रारी केल्या आहेत. तर कापड उत्पादक यंत्रमागधारक, व्यापाऱ्यांनी देशभरातील सूत व्यापारी आणि सूतगिरण्यांना ही प्रवृत्ती रोखण्याच्या सूचना केल्या असून हा नवा प्रकार वस्त्र उद्योगात चर्चेचा ठरला आहे.

सरत्या कापूस हंगामात ६० हजार रुपये प्रतिखंडी असणारा दर हंगामाच्या मध्यास सव्वा लाखापर्यंत पोहोचला. कापसाचे दर वाढल्याने त्याचा परिणाम सूत व्यवहार व विक्रीवरही झाला. सूत निर्मितीमध्ये भेसळ करण्याचे प्रकार घडले आहेत.

मिश्र धाग्याची बाजारपेठ

कापसापासून धागा बनवताना त्यामध्ये व्हिसकोस घटकाचेही मिश्रण केले जात आहे. वास्तविक पाहता वेगवेगळय़ा प्रकारचे मिश्रित धागे बाजारात उपलब्ध असतात. पॉली कॉटन, पॉली- विस्कॉस, पॉली अ‍ॅक्रीलिक, पॉली – वूल असे त्याचे काही प्रकार आहेत. धाग्याच्या बाजारपेठेत भारताचे स्थान वरचे आहे. भारत हा १०० टक्के सुती धाग्याच्या तसेच मिश्र धाग्याचा प्रमुख उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. ही बाजारपेठ दरवर्षी पाच टक्क्याने वाढत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तथापि मिश्रित धागा बाजारात विक्री करताना त्याचे प्रमाण किती आहे याचा उल्लेख करावा लागतो. उदाहरणार्थ ८० टक्के सुती २० टक्के व्हिसकोस, ३५ टक्के सुती ६५ टक्के पॉलिस्टर.

प्रवृत्ती चिंताजनक

तथापि, कापसाचे दर वाढल्याने त्यापासून धागा निर्माण करताना काही सूतगिरण्या सुमारे २५ टक्के व्हिसकोस मिश्रित करत आहेत. कापसाचा दर प्रतिखंडी एक लाख रुपये आहे. व्हिसकोस त्यापेक्षा ४० टक्के कमी दरात उपलब्ध होते. त्याचे बेमालूम मिश्रण करून सूतगिरण्या नफेखोरी करत असल्याची तक्रार आहे. परिणामी अत्याधुनिक रेपियर, एअरजेट मागावर कापड तयार करणाऱ्या यंत्रमागधारकांच्या संघटनांनी दक्षिण भारतातील सूतगिरण्यांची ‘सीमा’ ही संघटना, गुजरात स्पिनर्स असोसिएशन, महाराष्ट्रातील सूतगिरण्यांना याबाबत निर्भेळ व्यवहार करण्याबाबत सूचित केले आहे. इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशननेही याचे निवेदन इचलकरंजी यार्न मर्चंटस असोसिएशनकडे सादर केले आहे. सूत विक्री करत धाग्याचे मिश्रण केले असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख त्यावर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. असे न केल्याने कापडावर रंग, नक्षी प्रक्रिया (प्रोसेस) केली जात असताना गुणवत्तेचा अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याचे कापड खरेदी करणाऱ्या बडय़ा कंपन्या व निर्यातदारांनी यंत्रमागधारकांना कळवले आहे. या तक्रारीनंतर आता सूतगिरण्या व सूत व्यापारी विक्रीच्या शुद्धतेबाबत कोणती पावले उचलतात हे लक्षवेधी ठरले आहे.

कापसाचे भाव प्रचंड वाढल्याने काही मोजक्या सूतगिरण्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी १० ते २० टक्के इतके अल्प प्रमाणात पॉलिस्टर मिश्रण करण्याचे धोरण घेतले होते. मात्र अशा प्रमाणामुळे कापड रंग प्रक्रियेमध्ये फारसा फरक पडत नाही. व्हिसकोस म्हणून केल्या जाणाऱ्या तक्रारी वार्पिग स्टेजला एखादा धागा चुकून पॉलिस्टर आला असल्याने केल्या होत्या. बहुतांश तक्रारी मालेगावच्या होत्या. अडत व्यापाऱ्यांनी अशा कापडाचे कटींग दाखवून अनेक कारखानदारांकडून पैसे कापून घेतले आहेत.

किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ.

अत्याधुनिक मार्गावर कापड निर्मिती करण्यापूर्वी यंत्रमागधारक सुताचा दर्जा तपासून घेत असतात. कोणत्याही तक्रारी येऊ नये याबाबत ते दक्ष असतात. विस्कॉस मिश्रण तक्रारीबाबत मी स्वत: साशंक आहे. अशा तक्रारी असतील तर त्याचे निरसन होईल.

 – गोरखनाथ सावंत, संचालक, इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reputed textile companies complaints of using cheap types of yarns mixed in cotton zws