लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: वर्षा पर्यटनासाठी रांगणा किल्ल्यावर १७ पर्यटकांना दीर्घ प्रयत्नानंतर सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले. इतकी मोठी घटना भर पावसात घडत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मात्र मोहीम पूर्ण झाल्यानंतर तेथे पोहोचले. यातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वरती मागून घोडे प्रकाराचा प्रत्यय आला.

भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे पर्यटनासाठी कोल्हापूर, कागल, हुपरी येथील १७ पर्यटक गेले होते. सायंकाळी तेथून परत येत असताना भटवाडी येथील ओढ्यावर पाणी आल्याने ते अडकून पडले.

आणखी वाचा-कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाची जबाबदारी तरुण नेतृत्वावर; विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर यांची वर्णी

तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी अंतुर्लीचे सरपंच रामदास देसाई यांना ओढ्याच्या बाजूने जाऊ देऊ नका असे सुचवले. त्यामुळे त्यांनी पर्यटकांना तेथे थांबून घेतले. त्यातूनही दोघेजण जीवावर उदार होऊन दोरीच्या साह्याने ओढ्या पलीकडे गेले. तर मध्यरात्री ओढ्याचे पाणी कमी झाल्यानंतर एका महिलेसह उर्वरित पर्यटकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले.

प्रशासनाला जाग

ही घटना घडल्यानंतर तेथे वनविभागाने रांगणा किल्ला जाण्यास मज्जाव केल्यास त्याचा फलक लावला आहे. रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. तसे माहिती फलक भटवाडी, वाघ वहाळ व तांब्याच्या वाडी याठिकाणी लावण्यात आल्याचे भुदरगड तहसिलदार अश्विनी अडसूळ यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

रांगणा किल्ला पर्यटनासाठी गेलेले पर्यटक मध्यरात्री वेळी अडकून पडले असताना त्यांच्या बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कार्यक्षमपणे घटनास्थळी पोहोचून मदत करणे अपेक्षित होते. मात्र हे पथक बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर तेथे पोहोचले. याविषयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांना वारंवार विचारणा करून त्यांनी माहिती देण्याचे टाळले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescue of stranded tourists at rangana fort failure of disaster management mrj
Show comments