काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ते धर्मावर आरक्षण देतील, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी एका प्रचारसभेत बोलताना केला होता. मोदींच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता शरद पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली असून धर्मावर आधारित आरक्षण आम्हाला मान्य नाही, असं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“धर्मावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. हे कुणीही करणार नाही. जर उद्या मोदींनीही असे आरक्षण देऊ केले तरी आम्ही त्या विरोधात उभे राहू. मोदींचे विधान सामाजिक तणाव आणि कटुता वाढविणारे आहे. या रस्त्याने आपल्याला जायचेच नाही.”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा – “पंतप्रधानांनी निर्लज्ज मौन…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल; प्रियांका गांधींचीही संतप्त टीका!

दरम्यान, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक वर्षी एक असे पाच वर्षाला पाच पंतप्रधान देशाला मिळतील, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला होता. याबद्दल शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. “हा जावई शोध कुणी लावला? इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये आम्ही अधिक जागा मागितल्या नाहीत. आमचा एकच उद्देश आहे भाजपाचा पराभव करणे. पंतप्रधान कोण असणार? याची चर्चा झाली नाही आणि निवडणुकीपूर्वी करणे योग्यही नाही.” असे ते म्हणाले.

मोदी नेमकं काय म्हणाले होते?

राजस्थानच्या टोंक येथील सभेत बोलताना काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. “काँग्रेसने २००४ केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर आंध्रमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना दिले होते. देशभर त्यांना हे प्रारूप लागू करायचे होते. २००४ ते २०१० या काळात चार वेळा त्यांनी आंध्र प्रदेशात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्यांना हे लागू करता आले नाही, २०११ मध्ये काँग्रेसने हे प्रारूप देशभर लागू करण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservation on basis of religion is not acceptable said sharad pawar in kolhapur pc spb