कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचे नवीन अध्यक्ष नियुक्त केले असून त्यामध्ये तरुण नेतृत्वाला मोठी संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव, कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल देसाई व हातकनगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वास धन्यवाद देतानाच आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा संकल्प केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात भाजपाची जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होती. ती अनेक कारणामुळे रखडली होती. त्याची पक्ष कार्यकर्त्यांत चर्चा सुरू असताना नवीन अध्यक्ष निवडी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापुरात तरुणांना संधी मिळालेली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी राहुल चिकोडे यांच्या जागी सरचिटणीस विजय जाधव यांची निवड झाली आहे. १९९८ पासून भाजपामध्ये काम करत असताना युवा मोर्चामध्ये अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करू, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख नाही

हेही वाचा – कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

ग्रामीणसाठी २ अध्यक्ष

कोल्हापूर ग्रामीणसाठी यापूर्वी समरजितसिंह घाटगे हे एकच अध्यक्ष होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून लोकसभा मतदारसंघ निहाय दोन अध्यक्ष करण्यात आले आहेत. कोल्हापूर लोकसभासाठी राहुल देसाई यांना संधी देण्यात आली आहे. राहुल देसाई हे काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते व त्यांची पत्नी रेश्मा हे दोघे जिल्हा परिषद सदस्य होते. पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचाही त्यांना अनुभव आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजवर्धन नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे ते सुपुत्र. जिल्हा परिषद सदस्य तसेच शिरोळ तालुका भाजपा अध्यक्ष असा संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी ग्रामीण भागामध्ये भाजपाचा अधिकाधिक विस्तार करून लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility of bjp in kolhapur district on young leadership starring vijay jadhav rahul desai and rajvardhan nimbalkar ssb
Show comments