कोल्हापूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विशाळगडावरील व विशाळगडाच्या पायथ्याशी असणारे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. विशाळगडाच्या पायथ्याशी व विशाळगडावर १५७ अतिक्रमणं झालेली आहेत. ती काढण्यासाठी आदेश देऊन निधी सुद्धा वर्ग केला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ९० अतिक्रमणं तोडली आहेत. मलिक ए रेहानच्या थडग्यावर बांधलेले बेकायदेशीर बांधकाम, दर्ग्याच्या भोवती झालेली बांधकामे व विशाळगडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू झाली असताना काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतली असता न्यायालयाने अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यात थांबवावी, पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी, असा निकाल दिला होता.
हिवाळा संपत आला तरीसुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन चाल ढकलपणा करत आहे. ह्या विरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने नुकताच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदनही दिले होते.
शिवभक्तांच्या भावना संतप्त आहेत. आपण स्वतः कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण तोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आज मुंबई येथे मंत्रालयात विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विशाळगडच्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करावी, असे निर्देश दिले. कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी एक महिन्याच्या आत विशाळगडावरील सर्व अतिक्रमण कोल्हापूर जिल्हा प्रशासन हटवेल, असे सांगितले.