जातिधर्माच्या पल्याड पोहोचलेला करवीरनगरीतील अरीफ पठाण आणि सांस्कृतिक कार्याला हातभार लावण्याची मनीषा बाळगणारा वस्त्रनगरीतील मनोहर मस्कर व सुरेश कडकोळ या रिक्षाचालकांनी गुरुवारी श्रींची मूर्ती घरी पोहोचवण्याची मोफत सेवा पुरवत गणेशोत्सवात आपल्या औदार्याचे दर्शन घडवले. या सेवेचा अनेक गणेशभक्तांनी लाभ घेतानाच या रिक्षाचालकांच्या कार्याचे मन:पूर्वक कौतुक केले.
पुरेपुर कोल्हापूर अशी करवीरनगरीची ख्याती आहे. इथे बळकट बाहूंच्या बरोबरीनेच दिलदार मनाचीही प्रचिती येते. गंगावेसमधील अरीफ पठाण याने दिलदारपणाची चुणूक दाखवताना अनेक गणेशभक्तांना श्री मूर्ती घरापर्यंत पोहोचवण्याची नि:शुल्क सेवा पुरवली. त्याने आपल्या रिक्षावर भ्रमणध्वनी क्रमांकासह फलक लावला होता. तो करवीरनगरीत सोशल मीडियातून अनेकांपर्यंत पोहोचला. पाठोपाठ गणेशभक्तांनी त्याला सेवेकरिता निमंत्रित केले. एकापाठोपाठ एक अशा अनेक कुटुंबीयांना त्याने कन्या अरिफासह सेवा पुरवली. एकेकाळी भाडय़ाची रिक्षा चालवत होतो, पण महालक्ष्मीच्या आशीर्वादाने स्वमालकीची रिक्षा घेतली असून आता आपला संसार उत्तम चालला आहे, असे म्हणत पठाण यांनी आपण जातिधर्माच्या पलीकडे विचार करून ही गणेशसेवा करीत असल्याचा उल्लेख केला. इतकेच नव्हेतर पुढील वर्षी भाडय़ाच्या डझनभर रिक्षा घेऊन गणरायाची आगळी सेवा करण्याचा मनोदयही व्यक्त केला.
करवीरनगरीत गणेशभक्तीचे औदार्य घडत असताना वस्त्रनगरीतील रिक्षाचालकही मागे राहिले नाहीत. सुरेश कडकोळ आणि मनोहर मस्कर या रिक्षाचालकांनी मनी कोणतीही इच्छा अथवा श्रमाच्या फळाची अपेक्षा न बाळगता केवळ श्रद्धेपोटी विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी अनोख्या पद्धतीने सेवा दिली. हे दोघेही गेली अनेक वष्रे ही सेवा पुरवत असल्याने गणेशभक्तांनी त्यांना मनोमन शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी भेटून अभिनंदनाचा वर्षांव केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा