कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण, नद्यांमधील पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने पुराचा धोका जाणवू लागला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळी समीप आली आहे. जिल्ह्यात पावसाची संततदार कायम असून ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा पावसाने मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात सर्वत्र पाऊस राहिला. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत येऊ लागले आहे. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित केले जात आहे. नदीची पाणीपातळी सायंकाळी सात वाजता ४१ फूट ५ इंच अशी होती. ती धोका पातळी ४३ फूट या दिशेने धावत आहे. यामुळे नदी काठावरील गावांची धास्ती वाढत आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.राधानगरी धरण ८० टक्के भरले असून त्यातून १५०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे. वारणा, कासारी, कडवी, कुंभी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा अशा सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत चालला आहे.
जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ६८ मिमी पाऊस पडला पडला. शाहूवाडी ५५ , पन्हाळा ४४ , गगनबावडा ४८९, आजरा ४७, चंदगड ४५ मिमी येथेही मुसळधार पाऊस पडल्याची नोंद आहे. कमी पावसाचा पट्टा असणाऱ्या हातकणंगलेत २२ तर शिरोळ मध्ये १७ मिमी असा चांगला पाऊस पडला आहे. इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने जुना पूल वाहतुकीसाठी यापूर्वीच बंद झाला आहे. नदीच्या अलीकडे यशोदा हा छोटा पूल आहे. त्याचे रुंदीकरण काम सुरू असल्याने येथे पुराचे पाणी साचले आहे. परिणामी कर्नाटक, शिरोळ तालुक्याकडील वाहतूक ठप्प होऊन कामगार, व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांना फटका बसला आहे.