राज्य निवडणूक आयोगाने विहित कालावधीत आयकर विवरणपत्र दाखल न केल्याने मान्यता रद्द केलेल्यांमध्ये समाविष्ट असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन प्रमुख पक्षांना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष चिन्ह गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. या तिन्ही पक्षांना निवडणूक प्रक्रियेतील हा पहिला जबर फटका असल्याने त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. त्याची दखल घेऊन खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री विनय कोरे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रा. शहाजी कांबळे यांनी लगोलग जोरदार हालचाली सुरू केल्या असून, मंगळवारी निवडणूक आयोगाकडे संपर्क साधून विवरणपत्र देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका, नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर छोटय़ा पक्षांना रोखण्याचा कुटिल डाव खेळला जात आहे का, या दृष्टीनेही या पक्षांनी माहिती घेण्याचा आणि त्याच वेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा सोमवारी मुंबईत होत असताना तेथेच निवडणूक आयोगाने आयकर विवरणपत्र सादर न केलेल्या १८ प्रादेशिक पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुळातच अल्प अस्तित्व असलेल्या छोटय़ा पक्षांच्या मानहानीत भर घालणारा ठरला. करवीरनगरीत अवघ्या महिनाभरात मतदान होणार असताना येथील आखाडय़ात दंड थोपटलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्ष व खासदार रामदास आठवले यांच्या आरपीआय या तीन पक्षांना राज्य निवडणूक आयोगाचा फटका बसणार आहे. या तिन्ही पक्षांची नोंदणी रद्द झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अपशकुन घडला आहे. याचबरोबर शेतकरी संघटना व आरपीआय यांच्याशी मत्री केलेल्या भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षासोबत निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही हा धक्का बसला आहे.
पक्षाची मान्यता रद्द झाल्याचा निर्णय समजल्यानंतर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसह निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचाही हिरमोड झाला आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसण्याची शक्यता बळावल्याने कार्यकर्त्यांचाही धीर खचला आहे. छोटय़ा पक्षांना महापालिका निवडणुकीत अस्तित्व दाखविण्याची संधी मुळातच कमी असताना पक्ष चिन्ह नसेल तर उमेदवारांच्या खात्यातील मतांची संख्याही घटण्याचा धोका असतो. या बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे दाद मागण्याचे ठरवले आहे. त्याबाबत तातडीने पत्रव्यवहारही सुरूकेला असल्याचे खा. शेट्टी, विनय कोरे व प्रा. शहाजी कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आपल्या पक्षाची कागदपत्रे योग्य असल्याचा दावा करीत या नेत्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाचे एबी फॉर्म घेऊन उमेदवार पक्ष चिन्हासह निवडणूक लढवतील, असा विश्वास व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा