स्वातंत्र्यपूर्व काळात २०० कोटी रुपयांमध्ये झाला असता असा नदीजोड प्रकल्प ब्रिटिशांनी मुद्दाम केला नाही. त्यावेळी नदीजोड प्रकल्प झाला असता तर भारत याआधीच महासत्ता झाला असता. भारताच्या भवितव्यासाठी नदीजोड प्रकल्प आवश्यक आहे, असे मत माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांनी व्यक्त केले. अक्षरदालन आणि निर्धार यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कसबा बावडा ते त्रिपुरा या प्रकट मुलाखतीमध्ये दीड तास डी. वाय. पाटील यांनी उपस्थितांना भारावून टाकले.
१९६७ नंतर सलग ११ वष्रे आमदार म्हणून वैविध्यपूर्ण काम केले. नंतर तिकीट मिळाले नाही आणि मनात नसतानाही संजय गांधी यांच्या आग्रहामुळे उभा राहिलो तेव्हा जवळच्याच माणसांनी घात केला. नंतरच्या काळात सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आज डी.वाय. पाटील या नावे राज्यात ५ विद्यापीठे उभी असल्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २७ नोव्हेंबर २००९ साली त्रिपुराचा राज्यपाल म्हणून शपथ घेतली आणि तेथे वीज प्रकल्प राबवले. आजही राज्यपाल पदावर नसतानाही त्रिपुराला गेल्यानंतर तोच सन्मान मला दिला जातो हीच माझी जमेची बाजू आहे, असे मी मानतो असेही पाटील म्हणाले. निर्धारचे अध्यक्ष समीर देशपांडे यांनी वैविध्यपूर्ण प्रश्नांच्या माध्यमातून पाटील यांच्याशी संवाद खुलवला. रवींद्र जोशी यांनी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. नीलकंठ पालेकर यांचा सत्कार करण्यात आला.
आक्रोडाचा व्यापारी झालो असतो
एकदा मोटारीने आम्ही काश्मीपर्यंत गेलो होतो. या प्रवासाचा खर्च कसा काढायचा म्हणून तेथे आक्रोड स्वस्त मिळतात असे समजल्यानंतर एक ट्रक आक्रोड घेतले. मुंबईत आल्यानंतर दराची चौकशी केली तर काश्मीरमधील दरातच मुंबईत आक्रोड मिळत असल्याचे समजले. अखेर कोल्हापूरसह अनेक ठिकाणी आक्रोड वाटून टाकले. जर त्यावेळी तो व्यवसाय यशस्वी झाला असता तर कदाचित पुढे आक्रोडाचा व्यापारी झालो असतो अशी आठवण पाटील यांनी सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा