सदाभाऊ  खोत यांचे शेट्टींवर टीकास्त्र

कोल्हापूर : मंत्र्यांना मारले जात असल्याचे पाहायला मिळाले तरच त्यावर बोलणे योग्य ठरेल. पोकळ डरकाळ्या वर बोलण्याला अर्थ नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ  खोत खोत यांनी गुरुवारी येथे खासदार राजू शेट्टी यांच्यावर येथे केली.

दुधाची दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याने मंत्र्यांना उघडे करून मारण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी विदर्भ दौऱ्यावर बुधवारी दिला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खोत म्हणाले, गतवर्षीही संघटनेने मंत्र्यांच्या गाडय़ा अडवण्याचे आंदोलन चालवले होते. मी माढा येथे असताना असा प्रसंग उद्भवला होता. पण त्यानंतर पुन्हा कोणत्याही मंत्र्याची गाडी अडवली गेली असल्याचे असे ऐकिवात नाही. त्यामुळे आता कोणी मंत्र्यांना कपडे काढून मारण्याची भाषा करत असेल, तर त्यांनी हे कायद्याचे राज्य आहे हे लक्षात घ्यावे. पोकळ डरकाळ्यावर बोलण्याला अर्थ नाही.

मागील हंगामावेळी रयत क्रांती संघटनेने उसाला प्रतिटन एफआरपी अधिक तीनशे रुपये दर मिळावा, अशी मागणी केली होती. एफआरपी अधिक दोनशे रुपये असा  थोडय़ाफार फरकाने निर्णय मान्य झाला. आम्हाला उसाचे अर्थशास्त्र कळत नाही, असे काही मंडळींचे म्हणणे होते पण मिळालेला भाव पाहता आमचेच अर्थशास्त्र योग्य होते हे स्पष्ट झाले आहे, असे म्हणत त्यांनी शेट्टी यांना चिमटा काढला.

उसाच्या एफआरपीचा आधार बदलला असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा कांगावा काही मंडळींनी सुरू केला आहे. पण तो तथ्यहीन आहे अशी टीका करून खोत म्हणाले, उसाच्या एफआरपीसाठी साडे नऊ  टक्के असणारा आधार (बेस) दहा टक्के केला असला तरी प्रतिटन ६२ रुपये वाढ मिळणार आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

शेतकरी हल्लय़ावर मोघम भाष्य

मागील हंगामातील उसाची एफआरपी देण्यात सहकार मंत्र्यांचा कारखाना मागे राहिला असल्याकडे लक्ष वेधल्यावर  खोत यांनी बोलण्याचे टाळले. तर, नवी दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या हल्लय़ाच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कृषी राज्यमंत्र्यांनी ‘शेतकऱ्यांची दखल घ्यायला हवी होती’ असे गुळमुळीत मत व्यक्त केले. गोकुळ दूध संघाच्या बहुराज्य ठरावावर त्यांनी सभासद आणि दुग्ध विभागाचा निर्णय महत्त्वाचा राहील, असे सांगत आपली बाजू काढून घेतली.