शेतकरी चळवळीतून पुढे आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात अखेर शुक्रवारी आमदारकीची माळ पडली. यामुळे ‘बळीचा आक्रोश’ आता विधिमंडळात प्रखरपणे उमटण्यास मदत होईल. खासदार राजू शेट्टी, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह आणखी एक महत्त्वाचे पद स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्याने संघटनेला राजकीय व संघटनात्मक महत्त्व प्राप्त झाल्याने राज्यातील त्यांचा दबदबा वाढीस लागणार असे दिसत आहे.
सदाभाऊ हे मूळचे माजी मंत्री जयंत पाटील व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेत त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. नंतर त्यांचे मत्र जुळले ते राजू शेट्टी यांच्याशी. दोन दाढीधारी युवक नेत्यांनी आघाडी शासनाला सळो की पळो करून सोडले. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर या दोघांनी भाजपशी हात मिळवणी केली. शेट्टी विजयी झाले पण खोत पराभूत झाले.
केंद्रात शेट्टी व राज्यात खोत हे बळिराजाच्या प्रश्नावर आवाज बुलंद करतील, असा विश्वास प्रवक्ते योगेश पांडे यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला. पण याचवेळी खोत यांच्या चारित्र्याचा मुद्दा उपस्थित होत राहणार आहे. साक्री तालुक्यातील देवकीनंदन डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांना अटक झाली होती. याबाबत पांडे यांनी हे विरोधकांचे षडयंत्र असून ते अध्याप सिद्ध झाले नसल्याचे सांगितले.
‘बळीचा आक्रोश’ या पुस्तकाच्या माध्यमातून सदाभाऊंनी बळिराजाचं दाहक वास्तव मांडले आहे. याच पुस्तकातील मुद्दे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचे असतील, असे मुख्यमंत्र्यांनी प्रकाशनावेळी सांगितले होते. आता या दोघांना हा शब्द खरा करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा