सदाभाऊंच्या रूपाने शेतकरी संघटनेला तिसरी संधी
शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या डोईवर लाल दिवा मिळण्याचा तिसरा मान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या रूपाने मिळाला आहे. शेतकरी संघटनेचे जनक शरद जोशी व याच संघटनेचे मोरेश्वर टेंबुर्डे यांना थेट मंत्रिपद नसले तरी लाल दिवा होता. आता शिवारातून थेट मंत्रालयात खोत गेले असले तरी वेळप्रसंगी शिवारात परतायची तयारी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी केलेले विधान संघटनेला लाल दिव्यापेक्षा शेतकऱ्यांची बांधिलकी महत्त्वाची असल्याचेच दाखवून देते.
सांगली जिल्ह्य़ातील सहाशे लोकसंख्येच्या मरळनाथपूर गावातील सदाभाऊ खोत यांचा अखेर शुक्रवारी मंत्रिपदाचा शपथविधी झाला. मंत्रिपद कधी मिळणार या प्रश्नामुळे खोत पार भंडावून गेले होते. गेल्या अनेक दिवसांच्या त्यांच्या स्वप्नाला मूर्त रूप आले. शेतकऱ्याचा आक्रोश मांडणारा शेतकरी नेता आता लाल दिव्याच्या गाडीत बसला आहे. शेतकरी चळवळीतून अनेकांना विधानसभा-लोकसभा गाठता आली. त्याची सुरुवात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी केली. त्यांनी लोकसभाही गाठली होती.
केंद्रात जोशी यांच्याकडे टास्क फोर्सची जबाबदारी दिली होती. त्यास कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. शेतकरी नेत्याला या निमित्ताने प्रथमच लाल दिव्याची गाडी मिळाली. पुढे पुलोद सरकार असताना त्यांचे पाच आमदार निवडून आले. त्यातील एक होते, मोरेश्वर टेंबुर्डे. त्यांच्याकडे विधान परिषदेचे उपसभापतिपद सोपवण्यात आले होते. स्वाभाविकच मोरेश्वर टेंबुर्डे लाल दिव्याच्या गाडीतून फिरू लागले.
यानंतरही शेतकरी चळवळीतून शंकर धोंगडे, वामनराव चटप, सरोज काशिकर, अनिल गोटे, राजू शेट्टी, पाशा पटेल, सदाभाऊ खोत यांचा आवाज विधानसभा-परिषद येथे उमटला. शेट्टींनी विधानसभेनंतर लोकसभा दोनदा गाजवली आहे. मात्र यापकी कोणाला लाल दिवा मिळाला नव्हता. तो मिळाला सदाभाऊ खोत यांना. शेट्टी-खोत यांची दोन तपाची मत्री. संघटना बळकट करण्यासाठी, वाढवण्यासाठी हे दोघेही एकत्र राहिले, वावरले. पद, पसा, प्रतिष्ठा, पाश्र्वभूमी असे काहीही नसताना दोघांनी कर्तृत्व दाखवून दिल्याने वरचे राजकीय सोपान गाठता आले. आता खोत यांना लाल दिवा मिळाल्याने स्वतंत्र स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करणाऱ्या शेट्टी यांच्या निर्णयाला या मंत्रिपदाचे गोड फळ आले आहे. येथेच यापुढे राजू शेट्टी-सदाभाऊ खोत या जोडगोळीची खरी परीक्षा होणार आहे.