कोल्हापूर – सन २०१४ पासून गेली दहा वर्षे ‘केंद्रशासन’, ‘भारत सरकार’ हे शब्द गायब झाले आहेत. आणि केवळ ‘मोदी सरकार’ व ‘मोदींची गॅरंटी’ या शब्दांनी कब्जा केला आहे. ही एकाधिकारशाही, हुकूमशाही मनोवृत्तीची, व्यक्तीस्तोम याची प्रचार नीती आहे,अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष , वीजतज्ञ प्रताप होगाडे, प्रदेश महासचिव, प्रदेश किसान संघटन प्रमुख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,दलितमित्र शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
समाजवादी पार्टीच्या वतीने या निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘लोकतंत्र बचाव” ही पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन इचलकरंजी येथील कॉंग्रेस कमिटी मध्ये झालेल्या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, राजीव आवळे, उल्हास पाटील, मदन कारंडे, शशांक बावचकर, सयाजीराव चव्हाण, संतोष चौगुले, सागर चाळके, कॉ. सदा मलाबादे, राहुल खंजीरे, विनय महाजन, राजू आलासे, प्रा ए बी पाटील, शिवाजी साळुंखे, जाविद मोमीन इ मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा >>>गादीचा सन्मान राखा अन्यथा ‘तो’ फोटो व्हायरल करू; सतेज पाटील यांचा मंडलिक यांना इशारा
संविधान वाचवण्यासाठी आणि भाजपा सरकार पासून देशाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देशपातळीवर इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश मध्ये ६२ जागा लढवीत आहे आणि १७ जागा काँग्रेस लढवित आहे. संपूर्ण देशामध्ये काँग्रेस नंतर सर्वाधिक जागा समाजवादी पार्टी लढवीत आहे. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार पार्टीच्या वतीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये राज्यआघाडीत एकमताने निश्चित झालेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री शाहू छत्रपती आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामधील माजी सैनिक कल्याण समिती, जनता नागरी निवारा संघटना, आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार संघटना, धरणग्रस्त संघटना आणि विविध संबंधित संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी प्रचार कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये प्रताप होगाडे व शिवाजीराव परुळेकर यांनी दिली आहे.
यावेळी समाजवादी पार्टीचे कोल्हापूर शहर अध्यक्ष मधुकर पाटील, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष रवी जाधव, इचलकरंजी शहर अध्यक्ष जाविद मोमीन, हातकणंगले तालुकाध्यक्ष मुकुंद माळी, जिल्हा उपाध्यक्ष चंदगडचे प्रा. एन एस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गारगोटीचे प्रा. प्रताप देसाई, राज्य कार्यकारीणी सदस्य श्रीमती उषा कांबळे, धरणग्रस्त संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, अनिल माने, रंगराव नारिंगकर, माजी सैनिक संघटनेचे श्री कांबळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी श्रीमती प्राजक्ता व वडील मेघन पंडित इत्यादी उपस्थित होते.