कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात विरोधी महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा समाज माध्यमातून मंगळवारी रात्री दिला आहे.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कागल येथे आले होते. तेव्हा त्यांचे या प्रश्नाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यांनी याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा…इचलकरंजी दूधगंगा नळ पाणी योजनेचा अहवाल शासनास लवकरच सादर- जिल्हाधिकारी राहुल येडगे

पर्यायी मार्गाचा अवलंब शक्य

शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले, तर हा प्रकल्प नक्कीच पर्यायी मार्गाने होऊ शकतो, असा विश्वास वाटतो. याचमुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराचा वंशज आणि सहकार महर्षी स्व. राजे विक्रमसिंह यांचा चिरंजीव म्हणून हा प्रकल्प पर्यायी मार्गाने व्हावा, यासाठी मी कटिबद्ध आहे.