ज्येष्ठ नेते गोिवदराव पानसरे हत्याप्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर सोमवारी जोरदार युक्तिवाद झाला. यानंतर समीरच्या जामीन अर्जावर २३ मार्च रोजी निर्णय दिला जाईल, असे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. तसेच २९ मार्च रोजी होणाऱ्या चार्ज फ्रेमच्या सुनावणीसाठी समीरला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर विष्णू गायकवाडच्या वकिलांनी मंगळवारी दुसऱ्यांदा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर जामीन अर्ज सादर केला होता. यावर आज जोरदार युक्तिवाद झाला. समीरला न्यायालयात हजर करण्याची मागणी पटवर्धन यांनी केली. यावर कारागृहास वॉरंट देऊन समीरला २९ तारखेस हजर करण्याबाबत २३ मार्चला निर्णय घेण्याचे आदेश दिले.
अॅड.पटवर्धन म्हणाले, तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला असून कटातील मास्टर माईंडला शोधण्याजवळ पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. तसेच १७८(८) खाली अजून तपास बाकी असल्याचे सरकारी वकील सांगत आहेत. मात्र अद्याप तपासात काहीच प्रगती नाही. तपास किती दिवस चालणार हे माहित नाही यामुळे संशयिताने अजून किती वेळ कारागृहात घालवायचा याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे समीरच्या मानवी अधिकारांची पायमल्ली होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संशयिताने उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात जामीन केला नाही, असेही पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
समीर गायकवाड याचा पहिला जामीन अर्ज २८ जानेवारीस ज्या मुद्द्यांवर फेटाळला होता, तीच परिस्थिती सध्या आहे. समीरविरोधात प्रत्यक्षदर्शी व परिस्थितीजन्य पुरावे आहेत. समीर जर जामिनावर मुक्त झाला तर तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. तसेच या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या शाळकरी मुलावर दबाव आणला जावू शकतो, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद िनबाळकर यांनी केला. समीरला जामीन मिळाल्यास तो रुद्रप्रमाणे फरार होऊ शकतो असे सांगत समीरचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी न्यायालयात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा