कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात सोमवारी पोलिसांनी खून करणे, खुनाचा कट रचणे यासह पाच प्रमुख आरोप असलेले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. ३७२ पानांचे हे दोषारोपपत्र आहे. १८ डिसेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी होणार असून समीरला हजर राहण्याबाबत समन्स पाठविण्यात येणार आहे. समीरचे भ्रमणध्वनीवरील संभाषण, ७७ साक्षीदारांच्या साक्षी अशा महत्त्वाच्या नोंदी दोषारोपपत्रात आहे.
पानसरे खून प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर रोजी सांगली येथे अटक करण्यात आली होती. तर सुरुवातीला त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. सध्या तो येथे न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी गायकवाड याच्या विरोधात तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस.चतन्या, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांच्यासह तपासातील पोलिसांनी ३७२ पानी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. सुरुवातीला हे दोषारोपपत्र ७५० ते १००० पानी झाले होते. मात्र त्यात फक्त महत्त्वाचे मुद्दे एकत्र करून हे ३९२ पानी दोषारोप पत्र तयार करण्यात आले. आज दुपारी साडेबारा वाजता कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयाच्या प्रशासन विभागाचे सहाय्यक अधीक्षक एस. बी. मेथे यांच्याकडे सादर केले, त्या नंतर ते प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर सादर झाले. या प्रकरणामध्ये सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड वर भारतीय कलम ३०२, ३०७,१२० ब , ३४ प्रमाणे गुन्हा दोषारोपपत्रात दाखल करण्यात आला आहे तसेच १७३/८ या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी देखील पोलिसांना न्यायालयाने दिली आहे.
या दोषारोपपत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साक्षींची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने समीरने त्याची प्रियसी ज्योती कांबळे हिच्याशी १९ जून आणि २० जून रोजी जे संभाषण केले त्याचप्रमाणे त्याची बहीण अंजली झरकर हिच्याशी २१ जून तर त्याचा मित्र सुमीत खामणकर याच्याशी २७ जून २०१५ रोजी झालेल्या या सर्व संभाषणामध्ये कॉ. पानसरे यांच्या खुनाचे संदर्भ मिळत असल्याने हा सक्षम पुरावा दोषारोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. त्या सोबत एका विद्यार्थी साक्षीदारांसोबत ७७ साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष सरकारी अभियोक्ता चंद्रकांत बुधले यांनी दिली.
समीर गायकवाडच्या आवाजाचे नमुने केंद्रीय न्यायालयीक प्रयोग शाळा इथे पाठवण्यात आले होते, मात्र हे नमुने समीरचेच असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. कॉ.पानसरे यांच्या विरोधात फोंडा येथील न्यायालयात दोन खटले २०१० पासून सुरू आहेत, तसेच पानसरे हे विविध ठिकाणी व्याख्यानाला जात असत आणि त्या ठिकाणी सनातन संस्थेविरोधात त्यांनी भाष्य केले आहे. म्हणून सनातनने त्यांच्या विरोधात फोंडा न्यायालयात दोन खटले दाखल केले आहेत. त्या सोबतच सनातनच्या क्षात्रधर्म साधना या ग्रंथातील साधकांचे रक्षण व दुर्जनांचा नाश या वाक्यामुळे प्रभावीत होऊन समीरने ही हत्या केल्याचा आरोप नमूद करण्यात आला आहे. या तपासात मुंबई, ठाणे बीड येथील सनातन साधकांची चौकशी केल्याचा उल्लेखही या दोषारोपपत्रात आहे. दरम्यान १८ डिसेंबर रोजी कोर्टात हजर रहाण्यासंदर्भात त्याला समंस पाठवण्यात येणार आहे, असे देखील सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सांगितले.

Story img Loader