ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडच्या सोमवारी दाखल झालेल्या जामीनअर्जावर २२ जानेवारीस सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद िनबाळकर यांची नेमणूक करण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी गृहमंत्रालय, पानसरे हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटी पथकाकडे तसेच जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली.
तपासी अधिकारी चतन्या एस. यांनी १४ डिसेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर समीर विरुद्ध ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये समीर विरुद्ध गोिवद पानसरे यांच्या खुनाचा कट रचणे, साथीदारांसमवेत पानसरे दाम्पत्यावर हल्ला करून त्यांना ठार करणे तर उमा पानसरे यांना जखमी करणे, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलचा पुरावा नष्ट करणे, भारतीय हत्यार कायदा कलमांचे उल्लंघन करणे या कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. तसेच तपास अद्याप अपूर्ण नसल्याने अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना काही वेळ द्यावा अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. यानंतर खटला न्यायालयात दाखल करून तो सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता.
दरम्यान, समीर गायकवाडचे वकील अ‍ॅड. एम. एम. सुहासे, अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर समीरला जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये कोणतेही सबळ पुरावे नाहीत. तपासादरम्यान पोलिसांना गुन्ह्यातील मोटारसायकल, हत्यार अद्यापही मिळाले नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीमध्ये तफावत आहे. त्यामुळे समीरला जामीन मिळावा अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. या जामीनअर्जावर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
पानसरे हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी पानसरे कुटुंबीयाच्या वतीने गृहमंत्रालय, तसेच पानसरे हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. याच मागणीचे पत्र मेघा पानसरे, दिलीप पवार, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे यांना दिले.

Story img Loader