कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीत ७ नोव्हेंबपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला. पोलिसांनी बंदोबस्त पुरवला नसल्याने गायकवाडला न्यायालयात आणता आले नसल्याचे तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला आज सांगितले. तर गायकवाड याच्या ओळख परेडचा पंचनामा न्यायालयाने तपास यंत्रणेकडे सुपूर्द केला.
पानसरे खूनप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी विशेष पोलीस तपास पथकाने सांगली येथे राहात असलेल्या सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या घरावर छापा टाकला होता. दुसऱ्या दिवशी त्याला अटक करून न्यायालयासमोर दाखल केले होते, तेव्हा न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. तर अलीकडे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. ही मुदत सोमवारी संपली.
या प्रकरणी न्यायालय आज कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता होती. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले तेव्हा समीर गायकवाड हा न्यायालयात उपस्थित नव्हता. त्याचा खुलासा अप्पर वरिष्ठ तुरुंग अधीक्षकांनी केला. त्यांनी याबाबतची कारणमीमांसा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तुरुंग प्रशासनाने गायकवाड याला न्यायालयात दाखल करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मागितला होता. तो पोलिसांकडून उपलब्ध झाला नसल्याने गायकवाडला न्यायालयात आणता आले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी पंधरा दिवसांची वाढ करण्याचा निर्णय दिला.
दरम्यान, गायकवाड याच्या ओळख परेडच्या पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार योगेश खेरमाडे यांनी न्यायालयात सादर केला. न्यायालयाने तो पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केला. आज न्यायालयामध्ये सरकारी अभिवक्ता चंद्रकांत बोदले, गायकवाडचे वकील एम. एम. सुहासे, समीर पटवर्धन, पानसरे यांचे वकील अॅड. घाटगे उपस्थित होते.
समीर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
पोलिसांनी बंदोबस्त पुरवला नसल्याने गायकवाडला न्यायालयात आणता आले नसल्याचे तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
Written by अपर्णा देगावकर
First published on: 24-10-2015 at 03:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer gaikwad judicial custody increased