ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर विष्णू गायकवाड याला न्यायालयासमोर अत्यंत गोपनीय माहिती द्यायची आहे. यासाठी समीरला न्यायालयात हजर करावे अथवा तुरुंगप्रशासनाच्या अधिकाराने समीरने आपले म्हणणे लेखी द्यावे अशी मागणी समीरचे वकील अॅड्. वीरेंद्र इचलकरंजीकर, एम. एम. सुहासे, व एस. यू. पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली. यावर सरकारी वकिलांनी १७ नोव्हेंबर रोजी आपले म्हणणे सादर करावे असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी दिले.
दरम्यान समीरचे म्हणणे व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घ्यावे असे आदेशही न्यायालयाने दिले होते. यानुसार समीरशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तांत्रिक बिघाडामुळे व्हिडीओ कॉन्फरन्स होऊ शकली नाही. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनिलजीत पाटील यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबपर्यंत वाढ केली.
ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी समीर विष्णू गायकवाड याला सांगली येथून अटक केली होती. त्याच्याकडून २३ मोबाईल, ३१ सिमकार्ड जप्त करण्यात आले. याआधारे पोलिसांनी ज्योती कांबळे, श्रद्धा पवार, अंजली झनकर, सुमित खामनकर, अजय प्रजापती यांची नावे समोर आली होती. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर समीरची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती.
शुक्रवारी सकाळी समीरचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी समीरची न्यायालयाच्या परवानगीने कारागृहात भेट घेतली. यावेळी समीरने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या गोष्टी समीरला न्यायालयासमोर सांगायच्या आहेत. या गोष्टी तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून त्या समोर येणे गरजेचे आहे. यासाठी समीरला न्यायालयात हजर करावे अथवा समीरचे म्हणणे लेखी स्वरुपात घ्यावे अशी मागणी समीरचे वकील अॅड्. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अर्जाद्वारे केली. यावर मंगळवारी (दि. १७) सरकारी वकिलांनी आपले म्हणणे सादर करावे असे आदेश न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी दिले.
तसेच समीरशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधावा असेही डांगे यांनी सांगितले. यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी सुनीलजीत पाटील यांच्यासमोर घेण्यात आली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. पाटील यांनी समीरच्या कोठडीत शनिवार (दि. २१) पर्यंत वाढ केली.