आवाजाचे नमुने तपासणीसाठी रवाना
कॉ. गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड हा विशेष तपास पथकाच्या हाती लागला असला तरी त्याच्याकडून तपासाबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची माहिती गुरुवारी पुढे आली. पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली असून गायकवाडच्या दोघा मामेभावांना ताब्यात घेतले आहे. त्याच्या आवाजाचे नमुने गुजरातमधील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तपासासाठी पुण्याच्या सायबर क्राईम पथकाला येथे पाचारण करण्यात आले आहे.
पानसरे खून प्रकरणातील आरोपीचा शोध घेणाऱ्या तपास पथकाने बुधवारी सांगली येथील समीर गायकवाड या तरुणाला अटक केली. समीर याला कोणाकोणाची मदत मिळते यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच त्याचा संकेश्वर येथील मामेभाऊ श्रीधर जाधव व सुशील जाधव यांना आज ताब्यात घेण्यात आले. समीरप्रमाणे तेही सनातनचे साधक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, समीर याच्याकडून पोलिसांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याचे गुरूवारी सांगण्यात आले. तपासप्रमुख संजीवकुमार यांनी तो सहकार्य करीत नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी समीरच्या संभाषणाचे अनेक नमुने जप्त केले असून या आवाजाची खातरजमा करण्यासाठी ते गुजरातमधील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
पानसरे खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. तपासाच्या विविध बाजू आजमावून पाहिल्या जात असून त्याकरिता पुणे येथील सायबर क्राईमचे पथक गुरूवारी करवीर नगरीत दाखल झाले.

Story img Loader