ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याने शनिवारी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. समीरच्या या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एसआयटी प्रमुख संजयकुमार दोन दिवसांत कोल्हापुरात येणार आहेत. ९ ऑक्टोंबर रोजी समीरला न्यायालयात नेण्यासाठी बंदोबस्तास असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.
ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलीसांनी समीर विष्णू गायकवाड याला अटक केली होती. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर समीरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी समीरची न्यायालयीन कोठडी संपल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.
या वेळी समिरने ९ ऑक्टोंबर रोजी आपणास पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करत असताना एक व्यक्ती आपल्या नजीक आली. आपण पोलीस असून साहेबांचा निरोप आहे, की तू नार्को व ब्रेन मॅपींग चाचणीसाठी हो म्हण व आम्ही सांगेल ती नावे घे. अन्यथा तुला फासावर लटकण्याची पूर्ण तयारी केली असून तुझ्या घरच्यांनाही त्रास दिला जाईल. जर तू आमचे ऐकलेस तर तुला माफीचा साक्षीदार करुन २५ लाख रुपये दिले जातील. पोलीसांवरही काही सामाजिक संघटनांचा दबाव असल्याचा खळबळजनक खुलासा समीरने न्यायालयात केला होता.
समीरच्या या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एसआयटी प्रमुख संजयकुमार हे दोन दिवसांत कोल्हापुरात येणार आहेत. समीरला ९ ऑक्टोबर रोजी न्यायालयात नेताना बंदोबस्तासाठी असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Story img Loader