वाळू उपसा करणारी टोळी कोणत्या घटनेचा कसा फायदा उठवील हे सांगता येत नाही. याचे मासलेवाईक उदाहरण इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमध्ये पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची खोली वाढावी व पाण्याचा साठा व्हावा, यासाठी शासनाने गाळ उपसा करण्यास मंजुरी दिली आहे, मात्र गाळ सोडून वाळू उपसा करून त्याची विक्री करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याची दखल घेत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पाहणी केली असली तरी त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटावर शिरोळ पद्धतीने पोती रचून वाळूची आवटी बांधण्यात आली आहे. वाळू उपसा यंत्रामार्फत नदीतील वाळू उपसून या आवटीमध्ये टाकून तेथून जेसीबी व ट्रॅक्टरमार्फत लक्ष्मी मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावरील एका शेतात साठा करण्यात येत आहे.
या शेतामध्ये सुमारे २५ डंपर वाळूचा साठा करण्यात आला आहे. घटनास्थळी चौकशी केली असता ही वाळू गाळमिश्रित असल्याचे सांगण्यात येते.
शासनाने गाळ काढण्याची मंजुरी दिली आहे. याला बगल देत गाळाच्या नावाखाली वाळू उपसा होत आहे. गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेणारे आमदार सुरेश हाळवणकर यांनी यामध्ये लक्ष घालून तत्काळ संबंधितांना सूचना करून वाळू उपसा बंद करावा आणि गाळ काढण्यास सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
प्रांताधिकारी जिरंगे शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी, मंडल अधिकारी वसंत कोळी, तलाठी सुनील खामकर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.
उपसा केलेली वाळू लिलाव करून विकता येते का, याची चाचपणी सुरू असल्याचे समजते.
गाळ उपशाच्या नावाखाली पंचगंगेत वाळूची तस्करी
वाळू उपसा करणारी टोळी कोणत्या घटनेचा कसा फायदा उठवील हे सांगता येत नाही.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-06-2016 at 01:43 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand smuggling in kolhapur