कोल्हापूर : काही कांगावखोरांनी माझ्या वक्तव्याचा जाणीव पूर्वक विपर्यास चालू केला आहे. माझे वक्तव्य कोल्हापूरची गादी अथवा लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या विषयी नाही. विद्यमान शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत. हे वास्तव असूनही माझ्या विरोधात काही विषय मिळत नसल्याने काहींनी नसता कांगावा सुरु केला आहे .
कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने १९६२ मध्ये दत्तक वारस विरोधाला केलेल्या व्यापक जन आंदोलनाचा इतिहास आधी जाणून घ्या. पराचा कावळा करून स्टंटबाजीचा करत कांगावा करू नका. मी माफी मागायचा प्रश्न उद्भवत नाही. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेची दिशाभूल करू नका, असा इशारा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दिला.
हेही वाचा…संजय मंडलिक यांच्या त्या विधाना विरोधात शाहू प्रेमींची कोल्हापुरात निदर्शने
नेसरी (चंडगड) येथे प्रचार सभेच्या भाषणात मी स्पष्टपणे म्हटले आहे की , आताचे शाहू महाराज दत्तक वारसच आहेत. राजर्षि शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनताच आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. मात्र या विषयाचे राजकीय भांडवल करून स्टंटबाजी करणाऱ्यांनी त्याचा विपर्यास करून आपली पोळी भाजून घेऊ नये. राजर्षि शाहू , फुले , आंबेडकरांचे विचार आम्ही ६० वर्षापासून जगत आहोत. काल-परवा राजकारणात आलेल्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. मी जे स्पष्टपणे बोललो त्याचा अर्थ इतकाच की , कोल्हापूरची जनता हीच खरी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची वारसदार आहे.
मी जो विधान केले ते वास्तव आहे.कोल्हापूरचा स्वाभिमान दुखावल्याचा कांगावा करणाऱ्या सतेज पाटील यांनी माहीत करून घ्यावे की, आताच्या शाहू महाराजांना दत्तक घेताना कोल्हापूरच्या जनतेने त्यांना प्रचंड विरोध केला होता. त्यासाठी १९६२ साली न भूतो न भविष्यती असे जनआंदोलन झाले होते. त्यात गादीला दत्तक घेणाऱ्या व दत्तक येणाऱ्या दोघांनाही कोल्हापूरच्या जनतेने न भूतो न भविष्यती आंदोलन करून विरोध केला होता. हा इतिहास सोयीस्करपणे विसरून सतेज पाटील कांगावा करत आहेत. सतेज पाटील यांना वास्तव माहित असूनही या विषयाचा उसकावून राजघराण्याची अप्रतिष्ठा करत असल्याचा गंभीर आरोप संजय मंडलिक यांनी केला.
एका निवेदनात खासदार संजय मंडलिक यांनी म्हटले आहे की दत्तक प्रकरण काय आहे?
कोल्हापूर संस्थांनचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या कन्येच्या चिरंजीवाला दत्तक घेतले. ते दत्तक पुत्र म्हणजे सध्याचे छत्रपती शाहू महाराज त्यांचे पूर्वीचे नाव दिलीपसिंह असून ते नागपूरचे. त्यानंतर त्यांचे शाहू असे नामकरण करण्यात आले. त्यांना दत्तक घेताना कोल्हापुरात जनतेतून प्रचंड विरोध झाला होता. राजर्षी शाहू छत्रपती यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा छत्रपती शहाजी महाराज यांनी दत्तक घ्यावा, अशी जनभावना होती.
यासाठी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अवघे कोल्हापूर रस्त्यावर उतरले होते. राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या अंतःकरणात या नाती विषयी ममत्व होते. याच भावनेतून आम जनता दत्तक प्रकरणी पद्माराजे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. सरकारी दडपशाही झाली तरी जनतेने त्यांची परवा केली नाही. तरीही शहाजी महाराज यांनी मुलीचे चिरंजीव दिलीपसिंह यांना दत्तक घेण्याच्या हालचाली चालवल्याने शहरात व जिल्ह्यात संतापाची लाट उसळली.
हेही वाचा…‘शाहू महाराज खरे वारसदार नाहीत’, महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या विधानावर सतेज पाटील संतापले
कोल्हापुरात सायकल फेऱ्या निघाल्या. कोपरा सभा झाल्या. रात्री पेठा पेठा मधून मशाली मिरवणुकी काढण्यात आल्या. राजकीय पक्षांनी बिंदू चौकात सभा घेऊन पद्माराजे यांच्या मुलासच दत्तक घ्यावे अशी जाहीर मागणी केली. २४ जून १९६२ रोजी न्यू पॅलेसवर मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी विरोध केल्यावर जनता खवळली. जोरदार दगडफेक झाली.पोलिस वायरलेस गाड्या जाळण्यात आल्या. लाठीमार, अश्रूधूरांचा वापर झाला. विशेष म्हणजे लोकांनी न्यू पॅलेस वर काळे निशाण लावले.
कोल्हापुरात पद्माराजे सहाय्यक समितीने कडकडीत हरताळ पाळला. यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तरीही हे शाहू महाराजांचे दत्तकविधान झाले होते. हे वृत्त कोल्हापुरात वाऱ्यासारखे पसरले. त्यावेळी घराघरावर काळी निशाणे फडकावली, हरताळ पाळण्यात आला. शाळा कॉलेज बंद केली गेली. अनेक जहागीरदार आणि सरंजामदारानी या दत्तक विधानाचा निषेध केला होता. जनभावना एवढ्या संतप्त होत्या की शहाजी महाराज यांना सार्वजनिक ठिकाणी येणे मुश्किल झाले होते.या घटनेमुळे १९६२ ते १९८१ असा २० वर्षे येथील शाही दसरा सोहळा होऊ शकला नाही. याची माहिती कांगावा करणाऱ्यांनी जाणून घ्यावी, असे संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.