कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये बेळगावात शाब्दिक सामना रंगला. राम मंदिर विषयावरून राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. तर फडणवीस यांनी संजय राऊत काँग्रेसचे दलाली करण्यासाठी बेळगावात आल्याचा टोला लगावला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारात सहभागी होताना खासदार राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. भगवा रंग शिवसेना आणि एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना शोभतो. भाजपच्या नेत्यांना बेळगावात मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करताना लाज वाटली पाहिजे. मराठी माणसाच्या पराभवासाठी शिंदे येतात याची त्यांना लाज वाटत नाही का, असे टीकास्त्र त्यांनी डागले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत हे काँग्रेसचे दलाली करण्यासाठी येथे आले आहेत. राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही, असा प्रति टोला लगावला आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ‘ गैरव्यवहारात तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या आरोपीला प्रचारात उतरवण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले,’ अशा शब्दात राऊत यांचा समाचार घेतला आहे.
बजरंग दलावर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ
बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांना साथ देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावमध्ये प्रचार सभेत केले. तसेच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करणे बंद करावे, असा सल्लाही दिला.
फडणवीस यांना काळे झेंडे
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस बेळगाव येथे आले असता त्यांना काळे झेंडे दाखवले गेले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेळगावातील एकीकरण समितीने महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून त्यांच्या नेत्यांनी एकीकरण समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचारासाठी येऊ नये; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. आज बेळगाव उत्तरचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचार सभेसाठी फडणवीस उपस्थित राहिले. या वेळी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी टिळक चौक परिसरात त्यांना काळे झेंडे दाखवले. निषेध नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.