कोल्हापूर : कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याला बंटी पाटील घाबरत नाही काळम्मावाडी नळ पाणी योजनेची चौकशी कोणी करणार असेल तर ती करावी, असे आव्हान देत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला.खासदार धनंजय महाडिक यांची एक टर्म खासदारकी पुर्ण झाली आहे. आता दुसरा टर्म सुरु आहे. थेट पाईपलाईन वर बोलताना त्यांनी अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे. निवडणुकांचा विषय डोळ्यासमोर ठेवून टीका करणे योग्य नसून, त्यांच्या अज्ञानाची किव येते, अशा शब्दात महाडिक यांच्या टीकेला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थेट पाईपलाईन कामाची चौकशी लावून भाजपमधीलच कुणाला तरी त्यांना अडचणीत आणायच असेल, अशी खोचक  टिकाही सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.त्याला उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले, थेट पाईपलाईन योजनेचा विषय कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. मात्र १२-१३ वर्षानंतर जागे झालेल्या खासदार महाडिक यांनी प्रकल्पाला प्रथमच भेट दिली. याच मी स्वागत करत असल्याच त्यांनी सांगितले. थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यावर ते गेले. आणि त्यांनी कामाचं अवलोकन केले. मात्र यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. या कामाची कोणतीही चौकशी करा काहीही निष्पन्न होणार नाही. ज्या रुईकर कॉलनी भागात खासदार महाडीक राहतात त्या भागात १० नोव्हेंबर पासून थेट पाइपलाइनचे  पाणी जात आहे.मग योजनेवरून राजकारण करत थेट पाईपलाईन योजनेची बदनामी का करता? असा खडा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>>कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन भुदरगड तालुक्यात; लाक्षणिक उपोषणाला प्रतिसाद

खरंतर काळमवाडी ते कोल्हापूर हा,५३ किलोमीटरची पाईपलाईन योजना आहे . शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत.  इतकं अज्ञान दोन टर्म खासदार म्हणून काम करत असलेल्या महाडिकांना असू नये याची कीव येते, अशा शब्दातही आमदार पाटील यांनी खासदार महाडिक यांचा समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत सर्वे केला आहे. या सर्वेत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय माझ्याकडे जात असल्याने या योजनेला बदनाम करण्याचे राजकारण खासदार महाडिक करत आहेत, अशी टिका पाटील यांनी महाडिक यांच्यावर केली.

शिवाय, २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना ८८७ दिवस थेट पाईपलाईन योजनेच्या परवानग्या थांबवल्या होत्या. खासदार महाडिक चौकशीची मागणी करत असले तरी त्यांच्या या मागणीचा मी स्वागत करतो, असंही पाटील यांनी सांगीतले.थेट पाईपलाईन योजनेच काम होत असताना चंद्रकांत पाटील हे देखील कोल्हापूरचे पालकमंत्री होते. त्यामुळ चौकशीतून काहीतरी ऑन पेपर आणून खासदार महाडिक यांना भाजपच्या कुणाला तरी अडचणीत आणायचे आहे काय? अशी शंकाही उपस्थित केली.

हेही वाचा >>>शक्तीपीठ महामार्गाचे भूमी अधिग्रहण, रस्ते बांधकामात १२ हजार कोटीचा घोटाळा; राजू शेट्टी यांचा आरोप

थेट पाईपलाईन योजनेचे पाणी पुईखडी पर्यंत आले असून वितरणाची व्यवस्था अमृत योजनेतून करण्यात येत आहे. आणि अमृत योजनेचे काम भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे आहे. हे काम गेली अनेक वर्ष रखडले असुन महापालिकेने अमृत योजनेच्या ठेकेदारांला नऊ कोटीचा दंड केला आहे. हा दंड माफ व्हावा यासाठी खासदार महाडिक यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळ अमृत योजनेच काम ताबडतोब सुरू व्हावे याकरिता महाडिकानी यासंदर्भात तातडीने आढावा घेणार काय? असं आव्हानही सतेज पाटील यांनी दिले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर आरोप करणार असाल तर, जनता सुज्ञ आहे . लोकसभा निवडणुकीमध्ये जनताचं त्यांना योग्य उत्तर देईल,असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.  आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satej patil challenge to dhananjay mahadik regarding kalammavadi drainage scheme kolhapur amy