कोल्हापूर : ज्यांच्यासाठी जीवाचं रान केले. निवडून आणले. त्या खासदारांचे काम, कर्तृत्त्व काय आहे हे जनतेला व कार्यकर्त्यांनाही आता चांगलेच कळाले आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे गेल्या विद्यमान खासदारांच्या पाच वर्षातील अकार्यक्षमतेची व पुढच्या काळात शाहू छत्रपती महाराजांच्या माध्यमातून विकासाची असणार आहे. उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांच्या विरोधात ही लढाई आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडणार्‍या गद्दारांना त्यांची जागा या निवडणुकीतून दाखवून द्या, असा हल्लाबोल काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उमेदवार शाहू छत्रपती, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते.

माझ्याकडे ’तो’ फोटो आहे

गादीबद्दल काही लोक प्रश्‍न निर्माण करतात. मी त्यांना सांगितले की महाराजांबद्दल काही बोलू नका, माझ्यावर टीका करा, मी कसलेला पैलवान आहे. त्यामुळे उत्तर द्यायला समर्थ आहे. एकदा अंगावर माती टाकलेली आहे, त्यामुळे कुस्ती खेळायला मागेपुढे बघणार नाही. गादीचा सन्मान राखा. २०१९ च्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना महाराजांच्या पाया पडलेला फोटो माझ्याकडे आहे, याची जाण असू द्या, असा इशारा सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना दिला.

हेही वाचा – देशातील लोकशाही, पुरोगामी विचार धोक्यात; बाळासाहेब थोरात यांची टीका

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक विचार आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक देशात-विदेशातही पोहोचवला. त्यांचेच वारसदार शाहू छत्रपती आज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या देशात हुकूमशाही, दडपशाहीचा कारभार सुरू आहे. या विरोधात लढा देण्यासाठी व सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी शाहू छत्रपती यांना संसदेत पाठविण्याची गरज आहे.

शाहू छत्रपती म्हणाले, सत्ताधार्‍यांकडून लोकशाहीची पायमल्‍ली होत असताना याला विरोध करून लोकशाही टिकवण्याचे प्रयत्न इंडिया आघाडीकडून केले जात आहेत. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून पाठबळ द्यावे. यावेळी संजय करडे, दिलीप माने, आकलाख मुजावर, रामराजे कुपेकर, गिरीजादेवी शिंदे, नितीन पाटील, अभिषेक शिंपी, गोपाळराव पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. किसनराव कुराडे, स्वाती कोरी, डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी मनोगत व्यक्‍त केले.

हेही वाचा – इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र

या सभेला चंदगडचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रभाकर खांडेकर, गोडसाखर कामगारांचे नेते शिवाजीराव खोत, अमर चव्हाण, संभाजीराव देसाई, विक्रमसिंह चव्हाण-पाटील, गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, डॉ. संजय चव्हाण, अ‍ॅड. बाळासाहेब चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, काँग्रेसचे बसवराज आजरी, डॉ. अजिंक्य चव्हाण उपस्थित होते.

Story img Loader