कोल्हापूर : शासकीय वैद्यकीय मदतीचे साधे पत्र पाहिजे असले तरी खासदार तीन दिवस भेटत नाहीत. हे चित्र शाहू महाराज निवडून आल्यानंतर निश्चितपणे बदलले जाईल. एक कार्यक्षम खासदार म्हणून ते कार्यरत राहतील. प्रत्येक तालुक्यात त्यांचे जनसंपर्क कार्यालय १५ ऑगस्ट पूर्वी सुरू होतील, असे मत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ पहिलीच संयुक्त सभा आज रात्री महासैनिक दरबार हॉल येथे पार पडली. यावेळी पाटील बोलत होते. राज्यात आणि देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्याला केंद्रातील व राज्यातील सरकार कारणीभूत आहे, असा आरोप करून सतेज पाटील म्हणाले, एकीकडे जगभरातील प्रमुख नेते देशात येतात तेव्हा ते महात्मा गांधी यांच्यासमोर आदराने नतमस्तक होतात. परंतु जातीवादी पक्षाने नथुरामाचे उदात्तीकरण चालवलेले आहे. देश अधोगतीकडे नेणारी पावले पडत आहेत.

आणखी वाचा-माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

देश प्रगतीपती वर नेण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून इंडिया आघाडी, महाविकास आघाडी लोकांसमोर आली आहे. ती सत्तेवर येण्यासाठी शाहू महाराज यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला वधु पक्ष आहे असे समजून समजुतीची भूमिका घ्यावी. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन प्रचार केला पाहिजे.

दहा लोकांना विचारणा केली तरी नऊ लोक शाहू महाराज यांना मतदान देणार असे सांगत आहे. मात्र गाफील न राहता अजून महिनाभर असल्याने प्रचाराची गती वाढवत ठेवली पाहिजे. यासाठी सर्वांनी सतर्कपणे कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader