कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी सोमवारी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वांनाच आश्चर्चायाचा धक्का बसला होता. यावरून सतेज पाटील चांगलेच संतापल्याचंही बघायला मिळालं होतं. सोमवारी सांयकाळी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आता सतेज पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.
सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, सोमवारी जे काही घडलं त्यावर आता बोलण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. आता इथून पुढं कसं जावं, याची चर्चा मी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांशी करणार आहे. यासंदर्भात एक बैठक नुकताच पार पडली आहे. पुढची दिशा आम्ही संध्याकाळपर्यंत निश्चित करू, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.
या मुद्द्यावरून मला कोणताही वाद करायचा नाही. जे झालं ते खूप आहे. इथून पुढे जाणं आता महत्त्वाचे आहे. ज्या काही गोष्टी धडल्या आहेत, त्या सर्वांच्या समोर आहेत. त्यावर आता मी बोलणं संयुक्तिक नाही. महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन आम्ही आज संध्याकाळपर्यंत आमची भूमिका स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितलं.
छत्रपती शाहू महाराजांशीसुद्धा मी चर्चा केली आहे. त्यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मी कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. मला छत्रपती शाहू महाराजांबाबत आदरच आहे. गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूरमधील घडामोडींवर बोलताना राज्यातून काँग्रेस संपण्याची ही सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यासंदर्भात विचारलं असता, २३ तारखेला निवडणुकीची निकाल लागल्यानंतर राज्यातून कोण संपेल, हे त्यांना कळेल, प्रत्युत्तर सतेप पाटील यांनी दिलं.