कोल्हापूर : अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कोल्हापूर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. नागरिकांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करा, अशा सूचना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी एका बैठकीत केल्या. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक उपस्थित होते.

गडमुडशिंगी येथील ६४ एकर भूसंपादन खरेदी प्रक्रिया, त्यात करवीर उपविभागीय अधिकारी यांची उदासीनता, लक्ष्मीवाडीत ४७ बाधित कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न,लक्ष्मीवाडीतील कुटुंबीयांना मोबदला न देताच त्यांची नावे सातबारा पत्रकावरून कमी करणे आदी मुद्दे सतेज पाटील, शशिकांत खोत, बाबासाहेब माळी, आनंदा बनकर, रावसाहेब पाटील, विलास सोनुले आदींनी निदर्शनास आणले.

महिन्याभरात प्रश्न मार्गी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एक ते दीड महिन्यामध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच प्राधिकरणाकडील प्रलंबित प्रश्नांसाठी पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन दिले.

आत्मदहनाचा इशारा या वेळी केरबा बर्गे यांनी श्री महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था, गडमुडशिंगी या संस्थेतील १०५ सभासदांनी चुकीच्या भूसंपादनास विरोध दर्शवला आहे. हा प्रश्न जिल्हा प्रशासनाने मार्गी न लावल्यास विमानतळाच्या ठिकाणी आत्मदहन करू, असा इशारा दिला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satej patilto meet cm over land acquisition process of kolhapur airport stalled zws