लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आदिवासी विद्यार्थ्यांना वारणा दूध संघाचे २०० मिली टेट्रापॅक सुगंधी दुधाची चव चाखायला मिळणार आहे. अमरावती विभागातील सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी शनिवारी दिली.
राज्य शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दूध पुरवण्याची योजना आहे. करोना संसर्गामुळे थांबलेल्या या उपक्रमाची पुन्हा सुरुवात होत आहे. टेट्रा पॅक मधून सुगंधी दूध पुरवण्याची निविदा वारणा दूध संघाने भरली होती. त्यानुसार अमरावती विभागातील ८२ शाळांना वारणेचे सुगंधी दूध पुरवले जाणार आहे. सुगंधी दुधाचा पुरवठा होणाऱ्या पहिल्या वाहनाचे पूजन संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी वित्त व्यवस्थापक सुधीर कामेरीकर, आर. व्ही. देसाई, अधिक पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आणखी वाचा-मराठा आरक्षण निर्णयावर कोल्हापुरात आनंदोत्सव नाही
शासनाच्या या ऑर्डरमुळे संघाकडून अधिकच्या दुधाची निर्गत करता येणार आहे. लोणी बटर व दूध पावडर दराच्या चढउतारामुळे दूध उद्योगाला तोटा सहन करावा लागत असताना अशाप्रकारे दूध पुरवठा करणे संघाला फायदेशीर व सोयीचे ठरणार आहे, असे येडूरकर म्हणाले.
संरक्षण दलास पुरवठा
यापूर्वी वारणा दूध संघाने संघाने अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारला मिक्स मिल्क कॉन्सन्ट्रेट, अन्य राज्यांना दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा, संरक्षण दलास तूप, दूध पावडर, टेट्रापॅक मधील दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे.
सहा महिने टिकणारे दूध
वारणा दूध संघाचे सुगंधी टेट्रापॅक हे साधारण हवामानात १८० दिवस टिकू शकते. या दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम हि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या ते आरोग्यवर्धक ठरणार आहे, असे विपणन व्यवस्थापक अनिल हेर्ले यांनी सांगितले.