कोल्हापुरात शाळेच्या पहिल्या दिवसाचे जोरात स्वागत!

दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पहिल्या दिवशी शाळेत पाऊल टाकलेल्या विद्यार्थ्यांचे बुधवारी गुलाबांच्या सुगंधांनी आणि नव्या कोऱ्या पुस्तकांनी स्वागत झाले. नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन ड्रेस आदी वस्तू मित्रांना दाखवत बालगोपाल पहिल्या दिवशी आनंदात रमले होते. काही ठिकाणच्या बालकांना बलगाडी मिरवणुकीद्वारा शाळेत आणले गेले.

शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असतो. शाळा उघडण्याची वाट पाहात असतात. एप्रिल महिन्यात परीक्षा संपली आणि मुलांना सुट्टय़ा लागल्या होत्या. आता बुधवारपासून शाळा सुरू झाल्या. नव्याने येणारी मुले भोकाड पसरून शाळेत येत होती. तर बालवाडीचा अनुभव असलेली बालके पालकांसमावेत प्रसन्न मुद्रेने शाळेत आली. पालकांनी सर्व शालेय साहित्य आपल्या पाल्यासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे दिसले.

शाळेपासून कोणतेही बालक वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बलगाडी, घोडा यावर बसून मिरवणूक काढण्यात आली. सहा ते १४ वष्रे वयोगटातील प्रत्येक बालक नियमित शाळेत दाखल करण्यासाठी शिक्षण हक्क जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आल्याने विद्यार्थिसंख्या वाढली. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढली. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘मुला-मुलींना शाळेत पाठवा’ अशा घोषणा दिल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. सडा टाकून काढलेली रांगोळी, पानाफुलांनी सुशोभित केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबाची फुले, नवीकोरी पुस्तके, गणवेश देऊन स्वागत करण्यात आले.

 

Story img Loader