कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर च्या द्वैवार्षिक निवडणूकीत शुक्रवारी मुंबई येथे संपूर्ण राज्यातील मतमोजणी पूर्ण होऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल ने निर्विवाद वर्चस्व मिळविले. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच व्यवस्थापन समितिला १०पैकी ८ जागी ललित गांधी यांचे उमेदवार विजयी झाले. गव्हर्निंग काऊन्सील च्या ९०पैकी ८५ जागी ललित गांधी यांचे उमेदवार विजयी झाले. या निमित्ताने प्रतिष्ठेच्या चेंबर ऑफ कॉमर्स वर कोल्हापूरचा झेंडा लागला आहे. ललित गांधी यांनी आपले नेतृत्व पुन्हा एकदा प्रभावीपणे सिद्ध केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद‘ माणगावे (सांगली) यांनी १६०५ मते मिळवून विरोधी उमेदवार अनिल गचके (४८२ मते) यांना ११२३ मतांनी पराभूत केले. मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करूणाकर शेट्टी यांनी १३५मते मिळवून विरोधी उमेदवार व मुंबई जिल्हा बँकेच्या संचालिका कविता देशमुख (५५ मते) यांचा ८० मतांनी पराभव केला. ललित गांधी यांच्या पॅनेलचे विजयी झालेले अन्य उपाध्यक्ष पुढील प्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्र विभागातुन रमाकांत मालु व दिलीप गुप्ता, उत्तर महाराष्ट्र विभागातुन संजय सोनवणे व सौ. संगीता पाटील, कोकण विभागातून श्रीकृष्ण परब विजयी झाले.

आणखी वाचा-पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेवर कडाडले! अमृत योजनेतचे काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत चेंबरच्या ९८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच गेल्या ४० वर्षातील सर्व ११ माजी अध्यक्ष यांचा पुढाकाराने एकता पॅनेल ची स्थापना करून निवडणूक लढवून ललित गांधी यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मात्र ललित गांधी यांनी आपल्या कौशल्यपूर्ण नियोजनाद्वारे अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणार्‍या सर्व माजी अध्यक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या पॅनेलला चारीमुंड्याचीत करून राज्याच्या व्यापार-उद्योगाची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ वर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित करून एकहाती सत्ता काबीज केली.

आणखी वाचा-शिवसेनेच्या हिंदुत्वासाठी चंद्रकांत पाटीलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही; कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे प्रत्युत्तर

जोरदार व निर्विवाद विजयानंतर ललित गांधी यांनी राज्यभरातील सभासदांना धन्यवाद दिले व गेल्या दोन वर्षात केलेल्या झंझावती कार्याची पोचपावती दिल्याबद्दल हा विजय राज्यभरातील महाराष्ट्र चेंबर च्या सभासदांना अर्पण करत असल्याचे सांगितले. ट्रस्ट बोर्डचे चेअरमन, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ललित गांधी यांच्या बरोबर पॅनेल चे नेतृत्व केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल प्रभारी जे. के. पाटील यांनी काम पाहीले. निवडणूक समितिवर रमेश रांका व उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितिवर माजी अध्यक्ष अरविंद दोशी, अरूण ललवाणी व धनंजय दुग्गे यांनी काम पाहीले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of lalit gandhi as president of maharashtra chamber of commerce and industries mrj