अद्ययावत उपकरणांची निर्मिती हा स्वस्त, सुलभ वैद्यकीय सुविधेचा भाग आहे. त्यासाठी अनेक तरूण संशोधन करीत आहेत. त्याला सरकारकडून प्रोत्साहन मिळाले पाहिजे. पण लालफितीचा अडसर आणि स्वार्थी प्रवृत्ती यामुळे अडचणी निर्माण होत असल्याने अशा तरुण संशोधकांचा उत्साह सुकून जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारी कामकाज पद्धतीच्या दुखऱ्या नसेवर गुरुवारी बोट ठेवले. हे चित्र बदलण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
कणेरी मठ (ता. करवीर) येथील ‘सिद्धगिरी हॉस्पिटल’मध्ये बसवलेल्या ‘न्यूरो नेव्हिगेशन’ या मेंदू आजारावरील आधुनिक उपचार यंत्रणेचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. मठाधीश प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे या वेळी उपस्थित होते.
या वेळी भागवत यांनी विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती, त्यांची एकत्रित उपचारांची गरज, निरोगी जीवन पद्धत याविषयी चिंतन केले. ते म्हणाले, की प्रकृतीनुसार चिकित्सा झाली पाहिजे. एखाद्या प्रकृतीस लागू होणारी चिकित्सा दुसऱ्या प्रकृतीस लागू होईलच असे नाही. त्यामुळे रुग्णाची तब्येत सुधारण्यासाठी अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी अशा विविध चिकित्सांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. एकाच छताखाली अशी बहुचिकित्सा पद्धतीची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. ग्रामीण भागाला याचा चांगला फायदा होऊ शकतो.
भारतीय औषध पद्धत देशाची शान आहे असा विचार करून त्यास प्रोत्साहन मिळण्याची गरज भागवत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की भारतीय कंपन्यांनी तयार केलेले औषध विकत घेतले पाहिजे. हेच औषध बहुराष्ट्रीय पाश्चात्त्य कंपन्या विकत घेऊन आपल्या नावावर वीस पट अधिक किमतीने विकतात. आयुर्वेदिक औषध पद्धती लाभदायक आहे पण आता त्याचे प्रमाणीकरण (स्टॅण्डर्डडायझेशन) झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरसंघचालकांचे अनुभवाचे बोल
कोणती उपचार पद्धत रुग्णाला लागू होईल हे सांगता येत नाही, असे नमूद करून भागवत यांनी सामान्य देशी उपचाराचा आपल्या खांदेदुखीला लाभ झाल्याचा किस्सा ऐकवला. ते म्हणाले, की मला खांदेदुखीने त्रस्त केले होते. बरेच उपचार केले. एकदा मणिपूरमध्ये असताना तेथील स्वयंसेवकाने त्याच्याकडील पावडर लावून पायाने मालिश केले आणि अवघ्या आठवडय़ात माझी खांदेदुखी गायब झाली.