महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असली तरी हौशानवशांना उमेदवारी दिली जाणार नाही. निवडून येण्यास सक्षम व स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केले. उमेदवारांची घोषणा निवडणूक जाहीर झाल्यानंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
ते म्हणाले, शिवसेना उमेदवारांच्या मुलाखती आज-उद्या दोन दिवस सुरू आहेत. महापालिकेत शिवसेना निवडून येणार हे यावरून सिद्ध होत असल्याने इच्छुकांचा ओघ वाढत आहे. सेनेकडून स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक उमेदवार दिले जातील. सेनेचा जोर वाढता असल्याने पक्ष सोडून गेलेले पुन्हा पक्षात येत आहेत. मात्र निवडून येण्याची क्षमता असणा-यांना उमेदवारी दिली जाईल. त्याचबरोबर सेनेतून उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणी बंड करणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हद्दवाढीच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासनाच्या निधीची गरज आहे. मात्र हा निधी आणण्यासाठी लोकसंख्येची अट नेहमीच आडवी येते. तेव्हा लोकसंख्या वाढ करण्यासाठी हद्दवाढ गरजेची असून, महापालिकेत आमची सत्ता आल्यास सर्वाचा विचार घेऊन हद्दवाढीसाठी कार्यवाही करू. युतीबाबत वरिष्ठ पातळीवरून भाजपबरोबर चर्चा केली. आमचा तसा प्रस्तावही होता. मात्र त्यांना आमची अॅलर्जी आहे. त्यामुळे आम्हीही लाचार नसून शिवसेना सक्षमपणे निवडणुकीला सामोरी जाईल, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस आमदार राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, प्रकाश अबिटकर, सुनील िशदे, संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार उपस्थित होते.
सक्षम व स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनाच सेनेची उमेदवारी
सक्षम व स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी केले.
Written by अपर्णा देगावकर
First published on: 16-09-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena candidature to enable and clean characters people