कोल्हापूर: पन्हाळगडावर शूटिंगच्या दरम्यान कड्यावरून पडून अपघातात एक कलाकार गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने उपचारासाठी कोल्हापूरात दाखल करण्यात आले आहे. पन्हाळा येथील मुख्य सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास शूटिंग प्रसंगी ही घटना घडली आहे. नागेश खोबरे (वय १९ सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
पन्हाळगडावर विरात वीर दौडले सात या दिग्दर्शक महेश मांजरेकर निर्मित चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. शुटिंगकरिता मोठ्या प्रमाणात यंत्रणा तैनात केली आहे. रात्रीच्या सुमारास तट बंदीवर शुटींग केले जात आहे. मराठेशाहीच्या इतिहासावर आधारित या सेट मध्ये घोडे, वाहने व मनुष्य यांसह शूटिंगसाठी आवश्यक बाबींचा मोठा समावेश आहे. गेले चार दिवस शूटिंग दिवस-रात्र चालू आहे.
अंबरखाना, चार दरवाजा आणि सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान शूटिंग कामी अनेक कलाकार कार्यरत आहेत. त्यातील नागेश हा मोबाईल वर बोलत होता. बोलण्याच्या ओघात तो बुरुजावरून खाली पडल्याने जखमी झाला. त्याला तातडीने कोल्हापूरतील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.