श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक चंद्रकांत ऊर्फ सुभाष श्रीपतराव बोंद्रे (वय ६७) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.
बोंद्रे यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका रमा, चिरंजीव अभिषेक, भाऊ, बहीण असा परिवार आहे.  पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. सकाळी श्री छत्रपती शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात त्यांचे पाíथव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयूडी संचालक बी. आर. मोरे, प्राचार्य एच. एस. व्हनमोरे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, डॉ. जे. एफ. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पाíथव रंकाळा येथील निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अरुण नरके, माजी आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील व सर्व संचालक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचगंगा स्मशानभूमी येथे पुत्र अभिषेक यांनी चितेस भडाग्नी दिला.
माजी कृषिराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे चंद्रकांत बोंद्रे हे चिरंजीव १८ मे १९४९ मध्ये त्यांचा जन्म झाला. घरचा राजकीय व सामाजिक वारसा घेऊन चंद्रकांतदादांनी एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर आनंद दूध संघ पुरस्कृत दुग्ध व्यवसायाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. यानंतर स्वत: दुग्ध व्यवसायासंबंधी मार्गदर्शन शिबिरे घेऊन दुग्ध उत्पादक शेतक-यांना या व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले. महात्मा जोतिराव फुले सहकारी दूध व्यवसाय संस्था, फुलेवाडीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोकुळ दूध संघात त्यांनी १९९२ ते १९९६ आणि २००२ ते २००७ मध्ये संचालक म्हणून काम केले. तसेच २०१५ मध्ये त्यांना पुन्हा संचालकपदी सभासदांनी विरोधी पॅनेलमधून निवडून पाठवले. ही त्यांची या क्षेत्रातील कार्याची पोचपावती होती. तसेच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक ते उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन सुरू केले. विविध ग्रंथालयांना पुस्तके प्रदान करून वाचनसंस्कृतीला चालना दिली. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा