राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर २५ तारखेला कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवार यांची सभा होणार आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असणार आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
२०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. तर, शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीतून उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली आहे. यावर शाहू महाराज छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा : “ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही उमेदवार असणार अशी चर्चा सुरु आहे? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर शाहू महाराज म्हणाले, “मला याबद्दल माहिती नाही. मी लोकसभेसाठी इच्छूक आहे, असं म्हणणाऱ्यांना प्रश्न विचारा.”
राष्ट्रवादीकडून खासदार होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारल्यावर शाहू महाराज यांनी म्हटलं, “राष्ट्रवादी खासदार होण्याची इच्छा नाही. पण, यापूर्वी मला खासदार होण्याची इच्छा होती.”
हेही वाचा : “…तेव्हा राग आला नाही का?”, शरद पवारांचा उल्लेख करत भाजपा नेत्याचा राज ठाकरेंना थेट सवाल
तसेच, २५ ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित राहणार असल्याचं शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं.