कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज विरुद्ध खासदार संजय मंडलिक यांच्यातील लढत अटळ असली तरी त्यावर अंतिम मोहोर उमटायची आहे. त्याआधीच जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सलामीची रंगलेली खडाखडी पाहता हा आखाडा भलताच रंगणार याची झलक दिसू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापुरात शिंदेसेनेचे संजय मंडलिक हे संसद सदस्य आहेत. उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून त्यांनी ग्रामीण भागात विविध कामांचा शुभारंभ करीत मतदानासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. मंडलिक यांच्या ऐवजी भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे नाव पुढे येत आहे. ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शाहू महाराज यांची भेट घेतल्यापासून त्यांचे नाव झपाट्याने पुढे आले आहे. त्यानंतर त्यांनीही तुतारी शुभचिन्ह आहे. ती सर्व सगळीकडे वाजताना दिसेल, तुम्हाला अपेक्षित असणारी बातमी, ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल, असे विधान करीत आपल्या उमेदवारीचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा – छत्तीसगढमधील दारूण पराभवानंतर आता भाजपाच्या बालेकिल्ल्यातच थेट दोन हात करण्याचे आव्हान, काय करणार भूपेश बघेल?

महाडिक – संभाजीराजे भिडले

माजी खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरसह राज्यात स्वराज्य पक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. त्यामुळे रिंगणात शाहू महाराज की संभाजीराजे असा गुंता निर्माण झाला होता. पण संभाजीराजे यांनी शाहू महाराज यांच्यासाठी निवडणूक लढवणार नाही. राज्यात कोठेही स्वराज्य पक्ष निवडणूक लढवणार नाही, असे सांगून पडदा टाकला. त्यांच्या या भूमिकेवरून भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी टीका केली आहे. कालपर्यंत संभाजीराजे निवडणूक लढवण्याची जोरदार भाषा करत होते. आता त्यांनी अचानक माघार घेतल्याने त्यांच्या समर्थकांना हा धक्काच असेल, असे म्हणत संभाजीराजेंच्या तलवार म्यान करण्यावर बोचरी टीका केली. विरोधकांनी शाहू महाराजांच्या वयावर टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरूनही संभाजीराजे यांनी महाराज आजही सक्रिय आहेत. ते पूर्वी कुस्तीगीर होते. त्यांचे वय विचारणाऱ्यांना मोदींचे वय माहित नाही का, अशी विचारणा करीत थेट मोदींना वादात ओढले. त्यावर खासदार महाडिक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आणि कार्य देशाने पाहिले आहे. २५ वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत. त्यांच्या वयाबद्दल कोणी बोलू नये, असा प्रतिटोला लगावला आहे. त्यामुळे शाहू महाराजांचे वय हा प्रचारातील वादाचा मुद्दा ठरतो की काय असे दिसू लागले आहे.

हेही वाचा – काँग्रेस-आपचे मनोमीलन, पण नेत्यांचे काय? भारत जोडो यात्रेतच मतभेदांचे प्रदर्शन!

आजी-माजी पालकमंत्र्यात जुगलबंदी

दुसरीकडे, शाहू महाराज हे उमेदवार असणार का, त्यांनी या वयात निवडणूक लढवावी का यावरूनही मतांतरे व्यक्त होत आहेत. खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील असे वाटत नाही. जरी ते उमेदवार असतील तर आमचे वडिलकीचे नाते बदलणार नाही. ही निवडणूक दोन पक्षांतील विचारांवर होईल, अशी संयत भूमिका मांडली. तर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावे की न यावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचे आदर्श स्थान कायम राहावे असे वाटते, असे नमूद करताना निकाल कसा लागणार यावर सूचक टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीचा संदर्भ देत माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांना आदर्श मानता तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले. सक्षम उमेदवार देणे आणि तो भाजप विरोधात निवडून आणणे हे आमचे धोरण आहे. शाहू महाराज यांचे पुरोगामी विचारांचे नेतृत्व दिल्लीपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यावर, असे आवाहन करण्याइतका बालिशपणा सतेज पाटील यांच्याकडे कोठून आला? राजकारणात असे होत नाही, असे म्हणत मुश्रीफ यांनी पाटील यांना फटकारतानाच बिनविरोधची शक्यता फेटाळून लावली. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच शाब्दिक चकमकी सुरू झाल्याने कोल्हापूरचा आखाडा असा तापत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahu maharaj kolhapur who is the candidate against shahu maharaj in kolhapur print politics news ssb