कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या औचित्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या विविधांगी कार्याचा जागर करण्यासाठी मावळा कोल्हापूर फाउंडेशन मार्फत रविवारी येथे ‘शाहू विचार दर्शन पदयात्रा’ आयोजित केली होती. शाहू जन्मस्थळ येथून ज्योत प्रज्वलित करून ती दिगंबर जैन बोर्डिंग येथे आणण्यात आली. तेथून पदयात्रेस सुरुवात झाली. राजर्षी शाहूंनी साकारलेल्या विविध समाजातील वसतिगृहांना (बोर्डिंग) भेट देऊन तिथे मशाल प्रज्वलित करण्यात आली. रांगोळ्या, पुष्पवृष्टी, औक्षण करत यात्रेचे स्वागत विद्यार्थी, समाज बांधवांनी केले. मावळ्यांच्या शिव-शाहूंच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयक शाहू विचार, कार्यांच्या फलकांनी लक्ष वेधले होते.
व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, सबनीस बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, पांचाळ बोर्डिंग, मिसक्लार्क हॉस्टेल, शाहू वैदिक स्कुल, इंदुमती बोर्डिंग, देवल क्लब, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, गुरुमहाराज वाडा, दैवज्ञ बोर्डिंग, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, सुतार बोर्डिंग, नाभिक बोर्डिंग, वैश्य बोर्डिंग, देवांग कोष्टी बोर्डिंग, आर्य क्षत्रिय बोर्डिंग, गंगावेश तालीम, सत्यशोधक समाज, नामदेव शिंपी बोर्डिंग, गंगाराम कांबळे स्मृतीस्तंभ या शाहू स्थळांना भेट देत यात्रा शाहू स्मृती स्थळ येथे आली. राजर्षी शाहूंच्या समाधीला जेष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून यात्रेचा समारोप झाला.
हेही वाचा…ओबीसी आरक्षणाला धोका! मुस्लिमांसाठीचे कर्नाटक प्रारूप लागू करण्याचा काँग्रेसचा डाव : मोदी
यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाले की; आजच्या काळात युवा वर्ग एकत्रित येऊन राजर्षी शाहूंच्या स्मृतींना उजाळा देत आहे हे माझ्यासाठी अत्यंत आशादायी चित्र आहे. राजर्षी शाहू महाराजांनी विविध समुदायांसाठी उभारलेल्या वसतिगृहांमुळे ज्ञानाचा प्रकाश बहुजन समाजामध्ये पसरला. आधुनिक काळात होत असणाऱ्या आपल्या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक उद्धाराचा पाया या वसतिगृहांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी रचला होता. आज पुन्हा एकदा एकत्रित येऊन शाहूंनी स्थापन केलेल्या वसतिगृहांचे पुनरुज्जीवन करून शिक्षण प्रसाराचे काम बहुजन समाजाने केले पाहिजे असे मत व्यक्त केले. शाहूंचे विचार व कार्य समजून घेण्यासाठी आशा प्रकारचे अभिनव उपक्रम सातत्याने घेण्याचे त्यांनी सुचविले.
हेही वाचा…पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याची काँग्रेसची नीती देशातील जनता सहन करणार नाही – नरेंद्र मोदी
शाहू विचार दर्शन पदयात्रेमध्ये मावळा फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेश पोवार, रोहित आर. पाटील, यशस्विनीराजे छत्रपती, आपचे संदीप देसाई, सरलाताई पाटील, भारती पोवार, शिवराज नाईकवाडे, संदीप सूर्यवंशी, संदीप पाटील, शाहीर रंगराव पाटील, शाहीर दिलीप सावंत, रवी जाधव, आशितोष खराडे, देवेंद्र डांगोळे, संताजी भोसले, अमोल निकम, अमर सासणे, योगेश मांगोरे, विक्रम भोसले, अरुण सावंत तसेच प्रत्येक समाजातील विद्यार्थी, कोल्हापुरातील शिव-शाहू प्रेमी तरुण तरुणीं, महाविद्यालयिन युवक युवतीं, खेळाडू, कलाकार आणि नागरिग मोठ्या संख्येने सामील झाले होते.