लोकसत्ता प्रतिनिधी
कोल्हापूर: शरद कारखान्याने क्षारपड मुक्ती प्रकल्प राबविण्यास सुरवात केली आहे.या प्रकल्पासाठी सरकारसुद्धा ८० टक्के अनुदान देत आहे. उर्वरित २० टक्के रकमेचे व्याज कारखाना भरणार आहे, अशी घोषणा माजी आरोग्य राज्यमंत्री कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शनिवारी केली.
नरंदे येथील कार्यस्थळावर कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. पाटील म्हणाले, ऊस उत्पादन खर्चात झपाट्याने वाढ होत आहे. वातावरणाच्या बदलामुळे उस उत्पादनातील घट चिंताजनक बनली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्रीचा दर ३ हजार ५०० रुपये केला पाहीजे. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला अधिक चांगला दर देता येईल. गत हंगामात एफआरपी २८४४ रुपये असताना कारखान्याने २९०० रुपये दर दिला आहे. आसवणी प्रकल्प येत्या पाच वर्षात कर्जमुक्त होईल. खुली बाजारपेठ असताना साखर निर्यात बंदीचे धोरण बदलले पाहिजे.
आणखी वाचा-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापुरात कार्यान्वित
सभेस उपाध्यक्ष थबा कांबळे, जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील उपस्थित होते.संचालक रावसाहेब भिलवडे यांनी प्रास्ताविक,मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. आवटी अहवालवाचन, सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. आभार सुभाषसिंग रजपूत यांनी मानले.