कागलमधील काही लोकांना पक्षाने साथ दिली, त्यांना आमदार केलं, मंत्री केलं. मात्र, संकट आलं तेव्हा ते लोक पळून गेले. आगामी निवडणुकीत कागलमधील जनता त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा हल्लाबोल शरद पवार यांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. तसेच या निवडणुकीत निवडून आल्यानंतर समरजितसिंह घाटगे केवळ आमदार राहणार नाहीत, त्यांना मोठी जबाबादारी जाईल, असेही ते म्हणाले. कागालमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवरही टीकास्र सोडलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
“मी कोल्हापूरच्या गैबी चौकात यापूर्वी अनेक सभा घेतल्या आहेत. मात्र, अशी गर्दी कधीही बघितलेली नाही. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला, तरुणांसह सर्वच वयोगटाचे नागरिक उपस्थित आहेत. याचा अर्थ समरजितसिंह यांनी जो परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे, त्याला कागलमधील जनतेचं समर्थन आहे, हे दिसून येतं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
शरद पवार यांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांनाही लक्ष्य केलं. “तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. त्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत. त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल. आम्ही याच तालुक्यातील काही लोकांना साथ दिली, त्यांना मोठं केलं, आमदार म्हणून निवडून आणालं. त्यांना मंत्रीपद दिलं. मात्र, संकटाच्या काळात बरोबर राहण्याऐवजी ते पळून गेले. त्यांचा आता हिशोब करायचा आहे”, अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना, “कागल तालुक्यानं कधी लाचारी स्वीकारली नाही. ईडीची छापा पडल्यावर त्यांच्याच घरातील महिलांनी आम्हाला गोळ्या घाला, अशी प्रतिक्रिया दिली होती. असं असताना घरातील प्रमुखाने लाचारी स्वीकारली. आता कागलमधील जनता त्यांना थडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत”, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या घटनेवरून त्यांनी राज्य सरकारवरही टीकास्र सोडलं. “काही दिवसांपूर्वी मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. यावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. खर तर गेट वे ऑफ इंडियावर ६० वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला होता. त्याला आजपर्यंत काहीही झालेलं नाही. पण मालवणमध्ये आठ महिन्यात पुतळा कोसळला. याचा अर्थ कामात भ्रष्टाचार झाला आहे. आता या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही”, असं शरद पवार म्हणाले.