कोल्हापूर : राफेल विमान खरेदी किमतीबाबत मोठा घोळ आहे. आधीची राफेलची किंमत ३५० कोटी होती, ती किंमत १६६० कोटीपर्यंत गेली आहे. आता तर राफेलची कागदपत्रे चोरीला जातात. ही बाब अतिशय महत्त्वाची असताना ती लपवून का ठेवली, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला. कागदपत्रांच्या चोरीची माहिती संरक्षणमंत्र्यांनी संसदेला का सांगितली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संपूर्ण राज्यातील बूथ प्रमुखांसोबत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे चर्चा सुरू केली आहे. कोल्हापुरातील बूथ प्रमुखांसोबत सुद्धा पवार यांनी गुरुवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली.

पवार यांनी कार्यकर्त्यांंशी संवाद साधत त्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसन केले. याचवेळी आगामी निवडणुकीत कोणत्या मुद्यांवर सामोरे जायचे याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, की मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने अर्थव्यवस्था मंदावली. काळा पैसा किती आला तेही सरकारला माहीत नाही. नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांची नोकरी गेली. मोदी सरकारचे व्यवहार संशयास्पद आहेत. राफेल विमान खरेदीबाबत त्यांची भूमिका सर्वाना चकित करणारी आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करायच्या मागणीला उत्तर दिले नाही. बोफोर्स तोफांचा गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी व्हावी अशी याच लोकांनी मागणी केली गेली होती. राफेलची कागदपत्रे चोरीला जाण्यावरून त्यांनी केंद्र सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले.

मुश्रीफांच्या अनुपस्थितीची चर्चा

या संवाद कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. आमदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती नसल्याने कुजबुज सुरू झाली. मात्र मुश्रीफ हे कागल तालुक्यातील एका विकास कामाच्या शुभारंभात व्यस्त असल्याने ते येऊ  शकले नसल्याचा खुलासा खासदार महाडिक यांनी केला. त्यांच्या खुलाशानंतरही मुश्रीफ-महाडिक वाद अजून तरी शमलेला नाही अशीच चर्चा सुरू राहिली.

Story img Loader