कोल्हापूर : देशात सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांची नाकेबंदी केली जात आहे. या विरोधात पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आवाज बुलंद केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे केले. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कॉ. भालचंद्र कांगो, विजय देवणे, स्मिता पानसरे यांची भाषणे झाली.
पवार पुढे म्हणाले, फुले, शाहू,आंबेडकर यांनी पुरोगामी विचार जपला. तो आपण सर्वांनी पुढे नेण्याची जबाबदारी निभावली पाहिजे. देशात मोठा संघर्ष उभा आहे. या विरोधात समविचारी पक्षांना, संघटना एकत्र करीत आहोत. गोविंद पानसरे यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील.
खासदार डी. राजा यांनी आज मोदी गॅरंटीची भाषा केली जात आहे पण यांनी दोन कोटी तरुणांना रोजगार, १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन कोठे विरले हे विचारले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या प्रतिगामी शक्तींना पराभूत केले पाहिजे.
माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सध्या सत्तेत असणारे राज्य घटनेमुळेच आले असतानाही ते घटनेच्या मुलभूत तत्त्वांनाच तिलांजली देत आहेत. गोविंद पानसरे यांनी पुरोगामी विचार कायम जपला असताना तो संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते आहे. विचारवंतांचे विचार आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात विस्तार करण्यावर अजित पवारांचा भर
आमदार सतेज पाटील यांनी, अमृतकालाच्या नावाखाली जातीयवादाचा विचार पेरला जात असताना तो हाणून पाडण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.