कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असताना काल उद्धव ठाकरे शिवसेनेने त्यावर दावा केला होता. तर, आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा, अशी जोरदार मागणी केल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील मतभेद शनिवारी चव्हाट्यावर आले.
पाटील यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मतदारसंघ काँग्रेसकडे खेचण्याचा आक्रमक शैलीवर टीकास्त्र सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यापुरती मैत्रीपूर्ण लढत करण्याची हिम्मत सतेज पाटील यांनी ठेवली तर कोणाची ताकद किती आहे त्यांना पक्के समजेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा : भविष्य निर्वाह निधी विभागाची शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस, भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ
चंदगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी रविवारी या मतदारसंघात मेळावा घेतला जाणार आहे; तो रद्द केला नाही तर आम्हालाही प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देताना पाटील यांनी येथे उमेदवारी कोणाला द्यायची ही पक्षांतर्गत बाब आहे. शिवाय, काही झाले तरी आमचाच उमेदवार उभा राहिला, असे निक्षून सांगितले.