भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची एकच आघाडी केली जात आहे, हे सर्वथा खरे नाही आणि अशक्य आहे. ज्या राज्यात जो पक्ष प्रभावी असेल, तिथे त्याला अधिक महत्त्व देऊ न काँग्रेससह अन्य पक्षांनी दुय्यम स्थान घ्यावे. प्रभावी पक्षाने समविचारी पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार निवडणुकीसाठी जागावाटपात स्थान द्यावे असे हे समीकरण ठरवले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या ऐक्य प्रक्रियेविषयी पवार म्हणाले, की राज्याराज्यात भाजप विरोधी गटांना एकत्र आणायचा प्रयत्न मी करत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक राज्यात केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या कामगिरीबाबत प्रचंड नाराजी आहे. मित्रपक्ष असलेल्या सर्वाची बैठक १० डिसेंबर रोजी मी नवी दिल्लीत घेणार आहे. निवडणूक आली की राम मंदिराचा मुद्दा निघतो, असा टोला लगावून पवार म्हणाले, की विकासाची स्वप्ने दाखवलेल्या सरकारची कामगिरी फसली असल्याने असा भावनात्मक मुद्दा पुढे आणला जातो.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, की कोणाचे तरी आरक्षण काढून ते मराठा समाजाला देऊ नये. समाजातील गरीब माणसांमध्ये व जाती-जातींमध्ये या प्रश्नावरून दुही वाढता कामा नये.   केंद्र सरकार ‘सीबीआय’चा गैरवापर करीत असून विरोधकांवर दबाव आणण्याचे काम करीत आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांनी राज्यात सीबीआयला मज्जाव करण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे, अशा शब्दात या कृतीचे समर्थन करून पवार म्हणाले, की अशीच परिस्थिती राहिली, तर इतर राज्येसुद्धा अशाच प्रकाराची भूमिका घेऊ  शकतात. ‘ईव्हीएम मशीन’द्वारे घेण्यात येत असलेल्या निवडणुकांबाबत संशय येत असल्याने या निवडणुका पूर्वीप्रमाणेच जुन्या पद्धतीने मतदान घेण्यात याव्यात.

राणेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर अलीकडेच निवडून गेले आहेत. त्यामुळे ते लगेचच लोकसभा निवडणूक निवडणूक लढवतील असे काही मी ऐकले नाही, असे म्हणत पवार यांनी राणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. आगामी निवडणुका दोन्ही काँग्रेसने एकत्रित लढविण्याचे निश्चित केले असून जागावाटपही मार्गी लागले आहे, असा दावा करून पवार यांनी जागावाटपामध्ये वाद असल्याची शक्यता फेटाळून लावली.

Story img Loader