कोल्हापूर : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचे मत टोकाचे असल्याचे वाटत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढण्यावर वा स्वबळावर लढण्याबाबत आघाडीचा अंतिम निर्णय झाला नाही, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अमित शहा यांच्यावर सभेत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शब्दांत टीका केली; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मौन बाळगले, याकडे लक्ष वेधले असता, पवार यांनी यामध्ये मला कोणतेही संकेत दिसत नाहीत. अलीकडे अमित शहा यांच्या बोलण्याचा स्वर अतिटोकाचा झालेला आहे. देशाचे गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील, अशी अपेक्षा असताना त्यांच्याकडून तसे काही घडत नसल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार आमच्याकडे प्रवेश करणार आहेत, असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे केले. त्यांच्या दाव्याला उत्तर देताना पवार यांनी, सामंत हे तिकडे उद्योगातील गुंतवणूक आणण्यासाठी गेले आहेत, की पक्ष फोडायला? ते आमदार, खासदार कधी फुटतात याचीच वाट पाहतोय, अशी मिश्कील शेरेबाजी त्यांनी केल्यावर हास्य पसरले. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मीदेखील दावोसला गेलो होतो, असा उल्लेख करून पवार म्हणाले, की काल झालेल्या करारांपैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील असताना त्यांच्याशी दावोसमध्ये करार केल्याचे दिसते. इथल्याच कंपन्यांना तिकडे नेऊन करार करायचा आणि महाराष्ट्रात गुंतवणूक झाल्याचा देखावा करण्यात आला. याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र, ज्यांना गुंतवणूक करायची आहेल त्यांना महाराष्ट्रात एकत्र करायला हवे होते, असेही पवार म्हणाले.

Story img Loader