Saroj Patil on Sharad Pawar: शरद पवार यांच्या बहीण आणि माजी मंत्री एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी कोल्हापूरमधील कागलमध्ये जोरदार भाषण करत समरजीत घाटगे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर हा शरद पवारांचा आवडता जिल्हा आहे. आजोळ असल्यामुळे शरद पवारांचे ऋणानुबंध या जिल्ह्याशी जोडले गेलेले आहेत. कागलमध्ये अनेक वर्षांपासून निवडून येत असलेल्या हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांची साथ दिल्यानंतर मुश्रीफ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन शरद पवार यांनी त्यांना पराभूत करण्याची रणनीती आखली. हीच आक्रमकता आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सरोज पाटील यांच्या भाषणातही दिसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुश्रीफ गाडला जाणार – सरोज पाटील

सरोज पाटील आपल्या भाषणात म्हणाल्या की, कागलच्या सभेला भरपूर गर्दी झाली आहे. याचा अर्थ यावेळी मुश्रीफ नक्की गाडला जाणार. आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढलेली लोकं आहोत. त्यामुळे आमचे रक्त स्वाभिमानाने उसळते. पारतंत्र्यापेक्षाही आताचा काळ वाईट आहे. शरद पवारांनी मुश्रीफांना काय नाही दिले? असे असतानाही भ्रष्टाचार केला. दोन्ही हातांनी खा-खा खाल्ले आणि तुरुंगाच्या भीतीने पळून जायचे. आमचे जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याकडे बघा. त्यांना ईडी लागली का? ज्यांनी भरपूर खाल्ले त्यांनाच ईडीची भीती वाटते.

आपल्या मुलांना भिडे गुरूजींच्या नादाला लावू नका

तिकडे गेल्यानंतर तुमची मुले भिडे गुरूजीच्या नादाला लागतील. ते तुमच्या पैशे, दारू, जेवण, पेट्रोल देतील आणि मग गाड्या उडव्या म्हणतील. तेव्हा आपली मुले काय करतात, ते आवर्जून बघा. घाणेरड्या गटारगंगेत मुलांना जाऊ देऊ नका, असेही सरोज पाटील यांनी म्हटले.

सरोज पाटील यांची शरद पवारांसाठी कविता:

ईडीची भीती घालता कुणाला,
समोर निष्कलंक मोती उभा आहे,
कुस्तीचे डावपेच कुणाला सांगता
समोर भल्याभल्यांना अस्मान दाखविणारा हिंदकेसरी उभा आहे,

पवारांनी काय केलं, असं दररोज विचारता
पेटलेली मुंबई विझविण्यासाठी, दिल्लीच्या सत्तेवर निखारा ठेवून हा अवलीया उभा राहिला,

जातीवादी कुणाला म्हणता?
नामांतरासाठी राजकीय कारकिर्द पणाला लावणारा हा योद्धा उभा आहे

चोरासारखे उमेदवार का चोरता
समोर लोखंडाचे सोने करणारा परिस उभा आहे,
पवार थकले म्हणून कुणाला डिवचता
समोर ८४ वर्षांचा तरूण उभा आहे,
संपविण्याची भाषा कुणासाठी वापरता,
समोर समुद्र उभा आहे,
हिमालयाचा रुबाब कुणाला सांगता,
समोर निधड्या छातीचा सह्याद्री उभा आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar sister saroj patil speech in kolhapur says my brother strong enough to fight hasan mushrif defeat this time kvg