कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत मंगळवारी काँग्रेसने बाजी मारली. गटनेते शारंगधर देशमुख यांची स्थायी समिती, तर अनुराधा खेडकर यांची महिला बाल कल्याण समिती सभापतिपदी निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडप्रक्रिया पार पडली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडीपूर्वी सकाळी सत्ताधारी गटाच्या सदस्यांना घेऊन युवानेते ऋतुराज पाटील हे महापालिकेत दाखल झाले. स्थायी समिती सभापती निवडीसाठी सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीकडून गटनेते देशमुख आणि विरोधी भाजप ताराराणी आघाडीचे राजाराम गायकवाड यांच्यात लढत झाली. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात देशमुख यांनी ९ विरुद्ध ७ मतांनी विजय मिळवत हे मानाचे पद दुसऱ्यांदा मिळवले.
महिला बाल कल्याण समिती सभापतिपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी आघाडीच्या अनुराधा खेडकर आणि अश्विनी बारामते यांच्यात लढत झाली. खेडकर यांची ५ विरुद्ध ४ मतांनी निवड झाली. तर महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापतिपदी सत्ताधारी आघाडीच्याच छाया पोवार यांची निवड करण्यात आली. गांधी मैदान प्रभाग समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी आघाडीच्या रीना कांबळे आणि विरोधी भाजप ताराराणी आघाडीच्या संतोष गायकवाड यांच्यात लढत झाली असता कांबळे यांना १३ तर गायकवाड यांना ५ मते मिळाली. निवडीनंतर सत्ताधारी कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारात आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण केली.